भिकारी मुक्ती करण्यासाठी १२ मे पासून खास मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 09:34 PM2018-05-09T21:34:48+5:302018-05-09T21:34:48+5:30
शहरातील भिका-यांचे पुर्नवसन करण्यासाठी आवश्यक असलेल्या वाहने महापालिकेच्या वतीने पुरविण्यात येणार आहे.
पुणे: स्मार्ट सिटी पुणे शहराला शंभर टक्के भिकारी मुक्त करण्यासाठी येत्या १२ मे पासून संपूर्ण शहरात खास मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये उपमहापौर सिध्दार्थ धेंडे यांनी पुढाकार घेत पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. यावेळी पुढील तीन महिने पोलीस, महापालिका आणि महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सातत्याने कारवाई करण्याचे आश्वासन शुक्ला यांनी दिले. याबाबत धेंडे यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत शहरामध्ये भिकारी, भिक्षेक-यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्मार्ट सिटी म्हणून ओळख निर्माण करणा-या पुणे शहरासाठी रस्तो-रस्ती, चौका-चौकात उभे असलेले भिकारी हे चित्र चांगले नाही. यामुळे संपूर्ण शहर भिकारी मुक्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यासाठी पोलीस आयुक्तांना लेखी निविदेन देण्यात आले. त्यानंतर आयुक्तांनी देखील तातडीने दखल घेत परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त यांना तातडीने आदेश दिले. यामध्ये पुढील तीन महिने शहरामध्ये सातत्याने भिक्षेक-यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे धेंडे यांनी सांगितले.