पुणे जिल्ह्यात मतदार नोंदणीसाठी ४४२ महाविद्यालयात विशेष शिबिरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 02:27 PM2022-12-02T14:27:05+5:302022-12-02T14:28:32+5:30
सद्यस्थितीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु असून ८ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत..
पुणे : जिल्ह्यात युवा नवमतदार नोंदणीसाठी २५ नोव्हेंबर रोजी ४४२ महाविद्यालयात एकाचवेळी घेण्यात आलेल्या विशेष शिबिरात ३१ हजार ६४७ नवमतदारांची नोंदणी करण्यात आली. जिल्ह्यात १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली असून या मतदार यादीत एकूण ७८ लाख ७६ हजार ९५० मतदार समाविष्ट आहेत. सद्यस्थितीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु असून ८ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत.
पुणे जिल्ह्यात १७ वर्षावरील भावी मतदारांची व १८ वर्षावरील अर्हता पात्र युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. युवा मतदार नोंदणी वाढवून मतदार यादीचे सशक्तीकरण करण्यासाठी या युवा वर्गाला मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करुन त्यांना त्यांच्या मतदानाच्या हक्काविषयी जागरुक करण्यासाठी जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघा अंतर्गत येणाऱ्या ४४२ महाविद्यालयांमध्ये मेगा कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
या विशेष शिबिरात युवा मतदारांना मतदार नोंदणी करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत प्रशिक्षण आयोजित करुन नमूना क्र. ६ चा अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. नवमतदारांनी नमुना क्र. ६ चा अर्ज भरून शिबीरास चांगला प्रतिसाद दिला.
अद्याप नोंदणी न झालेल्या नवमतदारांसाठी ५ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये विशेष शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. सर्व पात्र युवामतदारांना महाविद्यालयातील विशेष शिबिरात नावनोंदणी करण्याची संधी मिळणार आहे. या संधीचा लाभ घेऊन युवा मतदारांनी त्यांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.