पुणे शहरातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीकरिता 'स्पेशल सेल'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 08:19 PM2020-04-13T20:19:21+5:302020-04-13T20:19:59+5:30
कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यू असलेला भाग...
पुणे : शहरात कोरोना आजाराने हातपाय पसरले असून शहरातील रुग्णसंख्या अडीचशे पेक्षा अधिक झाली आहे तर मृत्यू ३० च्या घरात झाले आहेत. शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत आढळून आलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आढळून आले असून सर्वाधिक मृत्यू सुद्धा याच हद्दीत झाले आहेत. हा परिसर सर्वाधिक संवेदनशील बनला आहे. त्यामुळे या परिसरासाठी पालिकेने विशेष कक्ष (स्पेशल सेल) सुरू करण्यात आला आहे. महापालिकेच्या हद्दीतील रुग्णांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. त्यातही भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक रुग्ण आहेत. दाटीवाटीने असलेली लोकवस्तीमुळे सोशल डिस्टनसनिंग पाळणे अवघड होत आहे. नागरिकांकडूनही प्रशासनाच्या सूचना फारशा गांभीर्याने घेतल्या जात नाहीत. कोरोनासदृश लक्षणे दिसली तरीही लवकर दवाखान्यात न जाण्यामुळे आजार बळावत असल्याचेही निदर्शनास आले आहे. या भागात तापासणीवर (स्क्रिनिंग) अधिक भर देण्यात येत आहे. शहरातील मध्यवस्तीतील सील करण्यात आलेल्या भागात भवानी पेठ परिसराचाही समावेश आहे. याभागात रविवारी रात्री उशिरापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांची संख्या ६९ होती. तर, मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा ११ वर गेलेला आहे. त्यामुळे या भागावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त स्तरावर सर्व आवश्यक कामे आणि उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु, अद्यापही नागरिकांचे हवे तसे सहकार्य मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालिकेने याभागात काम करण्याकरिता आणि अधिक कडक उपाययोजना करण्याकरिता विशेष कक्ष निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. या कक्षामध्ये दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विभागीय आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक आदींचा समावेश करण्यात आला आहे. हे पथक क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार काम करणार आहे. या भागात सखोल सर्वेक्षण करणे, अधिकाधिक स्क्रिनिंग करणे, लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी करणे आदी कामे केली जाणार आहेत. आतापर्यंत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे, त्यांना विलगिकरण करून औषधोपचार सुरू करणे, अनुषंगिक कामे या पथकाकडून केली जाणार आहेत.