विशेष मुलांनी लुटला हुर्डा पार्टीचा आनंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 01:19 AM2019-02-07T01:19:19+5:302019-02-07T01:19:47+5:30
शक्यतो हुर्डा पार्टीचा आनंद परिवारासह घेतला जातो. सामाजिक कार्यात असलेले लोक मित्रमंडळी व राजकीय व्यक्तींसह हा आंनद घेतात; मात्र विशेष मुलांना हा आंनद मिळवून देऊन वेगळ्या सामाजिक दृष्टिकोनाचा आदर्श बांधकाम व्यावसायिक मनोज व मुकेश छाजेड यांनी निर्माण केला आहे.
कात्रज - शक्यतो हुर्डा पार्टीचा आनंद परिवारासह घेतला जातो. सामाजिक कार्यात असलेले लोक मित्रमंडळी व राजकीय व्यक्तींसह हा आंनद घेतात; मात्र विशेष मुलांना हा आंनद मिळवून देऊन वेगळ्या सामाजिक दृष्टिकोनाचा आदर्श बांधकाम व्यावसायिक मनोज व मुकेश छाजेड यांनी निर्माण केला आहे. त्यांच्या आई शांताबाई यांची इच्छा यानिमित्ताने पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या परिवारासह हुर्डा पार्टीचा आनंद घेत असताना, त्यांची आई शांताबाई छाजेड यांनी अनाथ व अपंग मुलांनाही असा आनंद मिळवून देण्याबाबत सांगितले. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांची दोन्ही मुले मनोज व मुकेश छाजेड यांनी खडकवासला येथील त्यांच्या सिंहगड सृष्टी येथे पुण्यातील विविध अपंग व मतिमंद शाळेतील मुलांसाठी दिवसभर विविध खेळ, जेवण, नाष्टा व हुरडा पार्टीचे आयोजन केले होते. सर्वेषा सेवा संघ, बालकाश्रम, आपलं घर, अविश्रि बालसदन, अनिकेत मतिमंद शाळा, अन्नपूर्णा आश्रमशाळा अशा अनेक संस्थांच्या एकूण २०० मुलांनी व आजी-आजोबांनी हुरडा पार्टीचा मनसोक्त आनंद घेतला. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनदेखील केले होते. प्रसिद्ध निवेदक नकुल संघवी यांनी मुलांसाठी विविध खेळाचे आयोजन केले. मनोज छाजेड, मुकेश छाजेड, योगेंद्र चोरडिया, ललित शिंगवी, दिनेश मुनोत, नकुल संगवी यांनी प्रयत्न केले. सुरेखा भुरट यांच्यातर्फे सर्व मुलांना ब्लँकेटवाटप करण्यात आले. पोलीस निरीक्षक रेखा साळुंखे, अनघा देशमुख, उज्ज्वला मिरघे आदींनी या अभिनव उपक्रमाला भेट देऊन कौतुक केले.
या वेळी अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे, राष्ट्रवादी पुणे शहर चिटणीस प्रशांत गांधी, तुषार कानोजे, पंकज कावठिया, सिद्धेश माळवदकर, नचिकेत शेडगे, इम्रान शेख इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मी नेहमी विविध अनाथाश्रमांना भेट देत असते. मी माझ्या परिवारासह हुर्डा पार्टीचा आनंद घेत असताना अचानक मला या मुलांची आठवण झाली. मुलांना त्याबाबत सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने हा उपक्रम राबविल्याने समाधान वाटले. - शांताबाई छाजेड