बाळगोपाळांसाठीची खास कोरोना लस सप्टेंबरमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:13 AM2021-08-22T04:13:38+5:302021-08-22T04:13:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाचा विळखा दूर सारता यावा यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाचा विळखा दूर सारता यावा यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक, मॉर्डनानंतर झायडस कॅडिला कंपनीच्या ‘झायकोव्ह डी’ या लसीला औषध महानियंत्रकांकडून आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे. इंजेक्शनशिवाय दिली जाणारी ही पहिली लस असून १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठीही ही लस उपलब्ध होणार आहे. तीन डोसची ही लस सप्टेंबरच्या अखेरपर्यंत उपलब्ध होणार आहे.
झायडस कॅडीला कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शर्वील पटेल यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सध्या १ कोटी डोस बनवण्याची क्षमता विकसित झाली असून, जानेवारीपर्यंत ३-४ कोटी डोसचे उत्पादन करता येऊ शकेल असेही ते म्हणाले. पुढील दोन-तीन आठवड्यांमध्ये लसीचे किंमत जाहीर होणार आहे. झायकोव्ह-डी लसीचे परिणामकारकता ६६ टक्के असल्याचे मानवी चाचण्यांमधून सिद्ध झाले आहे. एका वर्षात १०-१२ कोटी डोस निर्माण करण्याचा कंपनीचा मानस आहे.
झायकोव्ह-डी ही जगातील पहिली प्लाझमिड डीएनए लस असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा, तर ५६ व्या दिवशी तिसरा डोस घेता येणार आहे. लस दोन डोसची करता यावी, यासाठी मंजुरी अर्ज करण्यात येणार असल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले. झायडस कंपनीला आयसीएमआर, जैवतंत्रज्ञान मंत्रालय, राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा आणि फार्माजेट यांचे सहकार्य लाभले आहे.
झायकोव्ह-डी ही लस २ ते ८ डिग्री सेल्शिअसला स्टोअर करून ठेवता येते. मात्र, २५ डिग्री सेल्शिअस तापमानात लस तीन महिन्यांपर्यंत टिकत असल्याचे सिद्ध झाले आहे. लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल लॅनसेट जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल पुढील दोन-तीन महिन्यांत हाती येतील, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले. आतापर्यंत २८ हजार स्वयंसेवकांवर लसीची चाचणी घेण्यात आली आहे. प्रौढांप्रमाणेच १२ ते १८ वयोगटासाठीही लस परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. सध्या या वयोगटासाठी लसीकरण उपलब्ध नसल्याने झायडस लस देताना त्यांना प्राधान्य दिले जाईल, असे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सरकारी आणि खासगी रुग्णालयांना लस देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही डॉ. पटेल म्हणाले.