दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पीएमपीएमएलची विशेष सुविधा
By अविनाश रावसाहेब ढगे | Published: February 20, 2024 08:54 AM2024-02-20T08:54:36+5:302024-02-20T08:54:51+5:30
२१ फेब्रुवारी ते १९ मार्चदरम्यान बारावी आणि १ मार्च ते २६ मार्च या कालावधीत दहावीच्या विद्यार्थ्यांना सुविधा दिली जाणार
पिंपरी : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ‘पीएमपीएमएल’ प्रशासनाने विशेष सुविधा जाहीर केली आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधीतच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी रोजी सुरू होत आहे. तर दहावीची परीक्षा १ मार्च रोजी सुरु होत आहे. परीक्षा कालावधीत बस पासधारक विद्यार्थ्यांचे बस पास त्यांच्या निवासस्थान आणि परीक्षा केंद्र यादरम्यान वैध मानण्यात येतील. त्यामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना वेगळे प्रवासी तिकीट घ्यावे लागणार नाही. तसेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बसमध्ये पुढील दरवाजातून प्रवेशाची मुभा राहील. शालेय व्यवस्थापनाकडून सूचना आल्यास काही मार्गांवर अतिरिक्त बसेसचे देखील नियोजन करण्यात येणार आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना प्राधान्याने बससेवा उपलब्ध व्हावी, याकरीता गर्दीच्या बसथांब्यांवर अधिकारी/ पर्यवेक्षकीय सेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. २१ फेब्रुवारी ते १९ मार्चदरम्यान बारावी आणि १ मार्च ते २६ मार्च या कालावधीत दहावीच्या विद्यार्थ्यांना सुविधा दिली जाणार आहे, अशी माहिती ‘पीएमपीएमएल’ प्रशासनाने दिली.