पोलीस कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा घालविण्यावर विशेष लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:11 AM2021-05-19T04:11:02+5:302021-05-19T04:11:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या वर्षभरापासून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ताणतणावात कर्तव्य पार पाडावे लागत आहे. त्यांच्यासाठी पोलीस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या वर्षभरापासून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ताणतणावात कर्तव्य पार पाडावे लागत आहे. त्यांच्यासाठी पोलीस कल्याण विभागाकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. प्रामुख्याने ड्यूटीपेक्षा कोविडची लागण झाल्यानंतर, त्यांना मानसिक धीर देण्यासाठी आवश्यकता अधिक असते. त्याचबरोबर आपण किंवा आपल्या कुटुंबीयांपैकी कोणाला लागण झाली, तर त्यांना आवश्यक ते उपचार त्वरित मिळतील, याविषयी पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये विश्वास निर्माण करून ते मानसिकदृष्ट्या सक्षमपणे ड्यूटी करतील, त्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्यापूर्वी पोलिसांच्या मानसिक आरोग्यासाठी प्रज्ञावंत हा उपक्रम राबविला जात होता. या शिबिरामधून त्यांना आपण कर्तव्यावर असताना आपली मानसिक, शारीरिक काळजी कशी घ्यावी, याची माहिती दिली जात होती. त्याचबरोबर ड्यूटी करताना प्रत्येक गोष्टीकडे कसे पाहावे, याविषयी मार्गदर्शन केले जात होते.
पोलीस अधिकारी व अंमलदार, तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी कोविड सेलची स्थापना करण्यात आली आहे. सहायक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली या सेलमध्ये एक पोलीस निरीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार यांचे पथक तैनात करण्यात आले आहे. संसर्ग झालेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना व त्यांचे कुटुंबीयांना वेळोवेळी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली जाते. त्याचबरोबर त्यांना आवश्यक असणारी मदत पुरविली जाते. शिवाजीनगर येथील पोलीस हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. कोणालाही त्रास झाल्यास तातडीने या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात येतात. त्यानंतर आवश्यकता वाटल्यास त्यांना पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या हॉस्पिटलमधील हलविण्यात येते.
ज्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे घर छोटे असून कुटुंबातील सदस्यांची संख्या जास्त आहे व ते कोविड १९ आजाराने बाधित झाले आहेत. अशासाठी होम आयसोलेशनची सुविधा वेगळ्या ठिकाणी करण्यात आली आहे.
दररोज तपासणी
प्रत्येक पोलीस ठाण्यात, तसेच विभागात सॅनिटायझर, ऑक्सिमीटर उपलब्ध करून दिले असून, ड्यूटीवर आल्यावर त्यांची ऑक्सिजनची पातळी तपासली जाते. पोलीस मुख्यालयातून पोलिसांच्या कल्याणासाठी वेगवेगळया सोयी-सुविधा परिमंडळामार्फत प्रत्येक पोलीस ठाण्यांना पुरविल्या जातात.
पोलीस आयुक्तांचा थेट संवाद
कोरोना काळात पोलीस दलातील ताणतणाव कमी करण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे सातत्याने पोलीस कर्मचाऱ्यांशी थेट व्हिडिओ कॉलिंग करून संवाद साधत असतात. कोरोनाची लागण झालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची विचारपूस करतात. कुटुंबाच्या स्वास्थ्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा सल्ला देतात. नाकाबंदीच्या ठिकाणी जाऊन बंदोबस्ताची पहाणी करण्याबरोबरच ते प्रत्येकाची वैयक्तिक चौकशी करतात.
.........
मानसिकदृष्ट्या सक्षमपणे पोलिसांनी आपले काम करावे, यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात वेलनेस ऑफिसरची नेमणूक केली असून, त्यांच्याकडून शहरातील पोलिसांची माहिती घेतली जाते. प्रत्येकाला गरजेच्यावेळी उपचार, औषधे वेळेवर मिळताहेत ना, याची तपासणी केली जाते. दुसऱ्र्या लाटेच्या सुरुवातीला इमर्जन्सीचे काही कॉल आले होते. त्यावर तातडीने आवश्यक ती मदत पुरविण्यात आली होती़ आता तसे कॉल येत नाही. पोलिसांच्या वेल्फेअरची संपूर्ण काळजी घेतली जात आहे.
- स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त, प्रशासन
.........
कोरोनाच्या या काळात पोलीस ठाण्यातून प्रकृतीची नियमितपणे विचारपूस केली जाते़ ड्यूटीवरून घरी गेल्यावर काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. तसेच पोलीस आयुक्तसही व्हिडिओ कॉलिंग करुन विचारपूस करतात़ घरच्यांची काळजी घ्या़ मुलांची काळजी घ्या, असा प्रेमळ सल्ला देतात.
- महिला पोलीस अंमलदार
......
पोलीस अधिकारी ७४४
पोलीस अंमलदार ७९००