चीनशी लढण्यासाठी स्पेशल फ्रंटियर फोर्स; छुप्या कारवायांसाठी माहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 01:03 AM2020-09-07T01:03:27+5:302020-09-07T06:50:59+5:30
२९-३० ऑगस्टला अक्साई चीन प्रदेशातील महत्त्वाच्या प्रदेशांवर मिळविला ताबा
- निनाद देशमुख
पुणे : पाकिस्तानने १९८४ मध्ये एका क्षुल्लक अशा केलेल्या चुकीमुळे सावध झालेल्या भारताने रणनीतीदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या सियाचीनवर ताबा मिळविला होता. यामुळे पाकिस्तानला हात चोळत बसावे लागले होते. तसाच काहीसा प्रकार आता भारत-चीन सीमावादात पेंगाँग सरोवरालगतच्या दक्षिण शिखरांबाबत उघडकीस आला आहे. भारताने अनपेक्षितपणे हालचाली करीत २९-३० ऑगस्टच्या रात्री अक्साई चीनमधील महत्त्वाचा भाग स्पेशल फ्रंटियर फोर्सच्या साह्याने ताब्यात घेत तिथे भारतीय तिरंगा फडकविला. या कारवाईमुळे चिनी लष्कराचे तिबेटी पठारावरील तळ भारताच्या टप्यात आले आहेत.
चीनला शह देण्यासाठीच १९६२ च्या युद्धानंतर तेव्हाचे आयबीचे संस्थापक डायेक्टर भोलानाथ मलिक तसेच दुसऱ्या महायुद्धातील सैनिक आणि ओडिशाचे मुख्यमंत्री राहिलेले बिजू पटनायक यांच्या सल्ल्यानुसार पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या फोर्सची स्थापना केली होती. भविष्यात भारताशी चीनचे युद्ध झाले तर चीनच्या क्षेत्रात घुसून वेगाने कारवाया करणे हे या फोर्सचे उद्दिष्ट होते. या संस्थेचे पहिले प्रमुख मेजर जनरल सुजानसिंग उबन हे होते.
सुजानसिंग उबन दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सैन्याच्या २२ माऊंटन डिव्हिजनचे कमांडन्ट होते. यामुळे या दलाला सुरुवातीला एस्टॅब्लिशमेंट २२ असे संबोधले जात होते. चीनला तोंड देण्यासाठी सीआयए या अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेने १९५०च्या दशकात भारताची तेव्हाची गुप्तचर संघटना इंटेलिजन्स ब्युरोच्या (आयबी) मदतीने तिबेटी बंडखोरांना प्रशिक्षित केले. सुरुवातीला नेपाळमध्ये त्यांना प्रशिक्षित करण्यात आले. चीनने तिबेट गिळंकृत केला, तेव्हा याच बंडखोरांनी १४ वे धर्मगुरू दलाई लामा यांना भारतात आणले. मोठ्या प्रमाणात तिबेटी नागरिकही भारतात आले
होते.
या फोर्समध्ये प्रामुख्याने लडाख, सिक्कीम येथील नागरिक तसेच भारतात आश्रय घेतलेल्या तिबेटी नागरिकांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पर्वतरांगामध्ये लढण्याचा अनुभव असल्यानेच त्यांना या फोर्समध्ये घेण्यात आले. आता गोरखा आणि बॉन वंशीय नागरिकांचाही या दलात समावेश करण्यात आला आहे. सुरुवातीला आयबीच्या अखत्यारित येत असलेली ही संस्था आता भारतीय गुप्तचर संस्था रिसर्च अँड अनॅलिसीस विंग (रॉ) यांच्या अखत्यारित काम करते. याचे मुख्यालय उत्तराखंड येथील छाकारता येथे आहे. सुरुवातीला सीआयए आणि आयबीच्या अधिकाऱ्यांनी एसएसएफमधील जवानांना प्रशिक्षण दिले.
कुठल्याही प्रकारच्या कारवाया करण्यास सक्षम
स्पेशल फ्रंटियर फोर्स अतिशय गुप्तपणे लष्करी कारवाया पार पाडते. लष्करासारखे कार्य असले, तरी ही संस्था लष्कराच्या आधिपत्याखाली येत नाही. ‘रॉ’च्या आधिपत्याखाली ही फोर्स कार्य करते. डायरेक्टर जनरल सिक्युरिटी यांच्या माध्यमातून ही फोर्स थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करीत असते.