राज्यात सोलापूर जिल्ह्याची विशेष छाप, मुख्यमंत्र्यांचे कौतुकोद्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 03:28 AM2018-11-17T03:28:46+5:302018-11-17T03:29:17+5:30
मुख्यमंत्र्यांचे कौतुकोद्गार : ‘श्रीमंती सोलापूरची’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन
पुणे : सोलापूर शहर जिल्हा अनेक वैशिष्ट्यांनी नटलेला आहे. खास करून सोलापूरची खाद्य संस्कृती मला आवडते. सोलापूरचे वस्त्रोद्योग जगभर प्रसिद्ध आहे. यातून सोलापूरची श्रीमंती दिसून येते, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे सोलापूर जिल्ह्यातील वस्तूंना सोलापूर बाहेर बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी आयोजिलेल्या सोलापूर फेस्ट २०१८ चे पुण्यात पंडित फार्म्समध्ये उत्साहात उद्घाटन करण्यात आले. सायंकाळी ‘श्रीमंती सोलापूरची’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या वेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संजय काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा कापड उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे व त्याचबरोबर विविध शेती उत्पादने आणि खाद्यपदार्थ यांसाठीही प्रसिद्ध आहे. या सर्व वैशिष्ट्यांचा समावेश या सोलापूर फेस्टमध्ये केला आहे.
‘सोलापूर फेस्ट’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून पुण्यातील नागरिकांना या उत्पादनांची खरेदी करता येणार आहे, तसेच अस्सल सोलापुरी चवीच्या खाद्यपदार्थांचा आस्वादही घेता येणार आहे. प्रदर्शनाच्या तीनही दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख, सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी, गुरुबाबामहाराज औसेकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, सोलापूर सोशल फाऊंडेशनचे संचालक अभिजित पाटील, पूर्वा वाघमारे, सल्लागार प्रा. देवानंद चिलवंत, नरेंद्र कानिटकर, प्रमोद साठे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.
१०० दालनांतून सोलापूरचा अनुभव
सोलापूर फेस्टमध्ये १०० दालनांचा समावेश आहे. सोलापूरची चादर, शेंगा चटणीपासून
महिला बचत गटाच्या अनेक वस्तू, रेडिमेड
कपडे, सेंद्रिय उत्पादने यांसह चित्रकारांच्या कलादालनाचा समावेश आहे.
सोलापूर महोत्सवात सामूहिक अग्निहोत्र
तीनदिवसीय सोलापूर महोत्सवासाठी डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांना आमंत्रित केले आहे. अग्निहोत्राचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून १७ नोव्हेंबरला सामूहिक अग्निहोत्र होणार आहे. महोत्सवातील तीन दिवस अग्निहोत्रविधीची माहिती व फायदे सांगणारे प्रदर्शन लावण्यात येणार आहे.