विशेष मुलाखत- पुनर्मुद्रणातून साहित्य अजरामर राहील : सुनील मेहता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:35 PM2019-03-23T12:35:48+5:302019-03-23T12:37:30+5:30
आगे बढो, देवाची माणसं, भल्या दिलाचा माणूस, शांता शेळके यांचे गवती समुद्र, द.मा.मिरासदार यांचे सोनियाचा दिवस, श्री.ना.पेंडसे यांचे प्रायश्चित्त अशा ५० पुुस्तकांच्या पुर्नमुद्रणाचे काम सुरु आहे.
- प्रज्ञा केळकर-सिंग-
मेहता पब्लिकेशनतर्फे सुमारे ५० पुस्तकांच्या पुर्नमुद्रणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याबाबत सुनील मेहता यांच्याशी लोकमत प्रतिनिधीने साधलेला संवाद
-----
* पुर्नमुद्रण प्रकल्पाचा उद्देश काय?
- अनुवादित पुस्तकांच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील साहित्य वाचण्यासाठी वाचकांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे. त्यामुळे जुन्या पुस्तकांचे पुर्नमुद्रण करण्याचा निर्णय घेतला. सध्या विजय तेंडुलकर यांची आगे बढो, देवाची माणसं, भल्या दिलाचा माणूस, शांता शेळके यांचे गवती समुद्र, द.मा.मिरासदार यांचे सोनियाचा दिवस, श्री.ना.पेंडसे यांचे प्रायश्चित्त अशा ५० पुुस्तकांच्या पुर्नमुद्रणाचे काम सुरु आहे. कोणत्याही भाषेतील क्लासिक्स अजरामर असतात. ती वाचकांपर्यंत पोहोचवणे प्रकाशकांचे काम आहे. १९६२-१९६५ या काळात अमेरिकेन सरकारने तेथील सर्वाधिक खपाची पुस्तके आणि क्लासिक्स यांचा मराठीत अनुवाद करण्याचा प्रकल्प जयवंत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतला होता.
---------------
कॉपी राईट कायद्याबद्दल काय सांगाल?
- एखाद्या पुस्तकाचा कॉपी राईट ६० वर्षांपर्यंत संबंधित लेखक किंवा त्यांच्या वारसदारांकडे राहतो. त्यानंतर कॉपी राईट खुला होतो आणि त्यानुसार पुढील निर्णय घेतला जातो. कॉपी राईटच्या मयार्देतील पुस्तकांबाबत लेखकाला न्याय मिळाला पाहिजे. पुस्तकांची नवी आवृत्ती किंवा पुर्नमुद्रण करताना लेखकाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे. कॉपी राईट कायद्याबाबत लेखकांनी जागरुक असले पाहिजे. दोघांमध्ये रितसर करार झाला पाहिजे. त्यासाठी लेखकांचे संघटन होणे आवश्यक आहे.
--------
पुर्नमुद्रणाचे प्रमाण वाढण्यामागील कारण काय?
- छपाईचे तंत्रज्ञान खूप अद्ययावत झाले आहे. पूर्वी हजारो प्रती काढून त्या गोदामात ठेवाव्या लागत होत्या. आता एका प्रतीपासून पाचशेपर्यंत कितीही प्रती प्रिंट आॅन डिमांड या तंत्रज्ञानामुळे छापता येऊ शकतात. पूवीर्ची काही पुस्तके आऊट आॅफ प्रिंट झालेली असतात, लेखक लोकप्रियतेच्या पडद्याआड गेलेला असतो. लेखकाला पुन्हा जिवंत करणे, वाचकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असते. त्यामुळेच पुर्नमुद्रण हाती घेतले जाते. पुस्तके छापील, ई बूक, आॅडिओ बूक अशा विविध स्वरुपात उपलब्ध होऊ शकतात.
-----------------
अनुवादाकडील कल वाढण्याचे कारण काय? मराठी पुस्तकांचा कमी अनुवाद होतो का?
- आज मराठी भाषेमध्ये पूवीर्सारखे मेहनती लेखक उरलेले नाहीत. माझ्या पुस्तकांच्या लाखो प्रती विकल्या जाव्यात, असे प्रत्येक लेखकाला वाटत असते. मात्र, त्यासाठी प्रकाशक, लेखक आणि माध्यमांकडून प्रयत्न आवश्यक आहेत. पुस्तक प्रकाशन, सोशल मिडिया, विविध गावांत जाऊन कार्यक्रम, अभिवाचन, पुस्तक परिचय असे उपक्रम राबवले गेले पाहिजेत. विविध भाषांमधील साहित्य वाचकांना आवडू लागले आहे. मराठीच्या तुलनेत इंग्रजी साहित्य जास्त सरस आहे. सध्या युगंधर, महानायक, संभाजी, स्वामी, महात्मा ज्योतीराव फुले ही पाच पुस्तके अॅमेझॉनकडून इंग्रजीमध्ये अनुवादित करण्याचे काम सुरु आहे. मराठीतील पुस्तके इंग्रजीत गेलीच पाहिजेत; मात्र, त्याआधी ती विविध भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाली पाहिजेत.