विशेष मुलाखत - ' पिफ ' मधील लघुपटांद्वारे आदिवासींकडे पाहाण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 11:30 PM2020-01-04T23:30:00+5:302020-01-04T23:30:02+5:30
यंदा प्रथमच '' पिफ '' मध्ये आदिवासी लघुपटांचा समावेश..
आदिवासी संस्कृतीमधील वारली चित्रकला सर्वांना परिचित आहे. पण आदिवासी जमातींनी संवर्धन केलेल्या इतर विविध कला, संस्कृती याचे प्रतिबिंब अद्यापही समाजामध्ये उमटलेले नाही. एकविसाव्या शतकात आपण आधुनिकतेविषयी चर्चा करतो. पण '' हीच मॉर्डन'' संस्कृती आदिवासी जमातीमध्ये पूर्वापार चालत आलेली आहे. याबददल अजूनही कित्येक जण अनभिज्ञ आहेत. आदिवासी कला-संस्कृती, त्यांची जीवनपद्धती यांचे दर्शन यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रसिकांना घडणार आहे.
यंदा प्रथमच '' पिफ '' मध्ये आदिवासी लघुपटांचा समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर '' आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण इन्स्टिट्यूटचे उपसंचालक हंसध्वज सोनावणे आणि विशेष कार्याधिकारी किशोरी गद्रे '' यांच्याशी संवाद साधला असता ' पिफ ' मध्ये आदिवासींचे लघुपट पाहिल्यानंतर मुख्य प्रवाहातील व्यक्तींचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
- नम्रता फडणीस -
* आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण इन्स्टिट्यूटच्या स्थापनेमागील उददेश काय?
-ही संस्था पुण्यात 1962 साली स्थापन झाली. आदिवासी संस्कृतीचे संवर्धन करणे, त्यांच्या विविध कला प्रदर्शित करणे, त्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करणे तसेच संस्थेमध्ये आदिवासी जमातींचे संशोधन करणे,हा संस्थेच्या स्थापनेमागचा हेतू आहे.
* महाराष्ट्रात आदिवासींच्या किती जमाती आहेत?
-महाराष्ट्रात 45 मुख्य जमाती आणि 180 उपजमाती आहेत. ही सरसकट अशी एक संस्कृती असून, प्रत्येक जमातीचे वैशिष्ट्य वेगळे आहे. संस्थेमार्फत प्रत्येक जमातींच्या परस्पर संस्कृती आणि मानववंशशास्त्रज्ञांप्रमाणे त्यांचा पर्यावरणीय अभ्यास व संशोधन केले जाते.
*पिफमध्ये प्रथमच आदिवासी लघुपटांचा समावेश केला जातोय. त्याविषयी काय वाटते?
-पिफच्या संयोजकांकडून आम्हाला महोत्सवात सहभागी होण्याचे निमंत्रण आले तेव्हा आम्हाला आनंद झाला. आमच्या भूमिकेला हे अनुसरून होते. आदिवासी समाजाची ओळख इतर समाजाला करून देण्यासाठी हे चांगले व्यासपीठ वाटले. आंतरराष्ट्रीय स्तरावर जर ही ओळख न्यायची असेल तर पिफ सारखा महोत्सव नाही. त्या उददेशाने आम्ही हे निमंत्रण स्वीकारले.
* पिफमध्ये सादरीकरण होणारे लघुपट कोणत्या विषयांवर आधारित आहेत?
- आम्ही लघुपटासाठी काही विषय दिले होते. त्यानुसार लघुपट पाठविण्याचे आवाहन संस्थेने केले होते. आदिवासी ही खूप जुनी संस्कृती आहे. त्यामुळे आदिवासी वास्तू, वेशभूषा, पारंपारिक वाद्य, त्यांच्या नैसर्गिक साधनसामुग्रीवर आधारित उपचारपद्धती आणि आधुनिकता या विषयांचा त्यात समावेश करण्यात आला. राज्याच्या सीमेलगत आदिवासी समाज वसलेला आहे. पूर्व महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आदी भागांमधून 45 लघुपट आले होते. त्यामधील 15 लघुपटांची निवड करण्यात आली.
* आदिवासी समाजातील कलासाक्षरतेविषयी काय सांगाल?
- आदिवासी कुटुंबातील प्रत्येक सदस्य हा कलासाक्षर आहे. ते कलेच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. त्यांच्या गाण्यात सर्वप्रकारचे मिश्रण पाहायला मिळते. व्यवसाय कौशल्यांतर्गत आम्ही त्यांना व्हिडिओ मेकिंग चे प्रशिक्षण दिले. ज्याचा त्यांनी लाभ घेतला. आम्हाला सर्वात अधिक लघुपट हे संगीत विषयावरच निर्मित केलेले आढळले. आदिवासी व्यक्तींनी अधिक लघुपट पाठविले हे नक्कीच आशादायी चित्र वाटते. ते आपल्या संस्कृतीकडे कशा दृष्टीकोनातून बघतात हे कळले. त्यांच्या चेह-यावर आनंद आणि निरागसता अनुभवायला मिळाली.
* आदिवासी जमातीमधील तरूणपिढीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्थेमार्फत कोणती पावले उचलली जातात?
-आदिवासी तरूण पिढीला कौशल्यविकासावर आधारित प्रशिक्षण दिले जाते. शाळेची मुले आणि शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम राबविला जातो. आदिवासी कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आमचे महोत्सव होतात. वेगवेगळ्या शहरात जाऊन आदिवासी संस्कृतीची ओळख करून देतो. उच्चभ्रू समाजातील महोत्सवांमध्ये आदिवासीतल्या उत्तम कलाकारांची निवड करून त्यांना तिथे पाठविले जाते. साहित्य किंवा नाट्य संमेलनात देखील एक आदिवासी दालन ठेवण्यासाठी विचार करत आहोत. यानिमित्ताने मुख्य प्रवाहातील लोकांना त्यांची ताकद कळेल. आपल्याला त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे.
* आदिवासी इतके प्रगत असूनही हा घटक दुर्लक्षितच राहिला आहे असे वाटते का?
- हा समाज इतका आधुनिक असूनही तो मागासलेला आहे असा समज आहे. तोच आम्ही पुसण्याचा प्रयत्न करीत आहोत.ह्ण पिफह्ण मध्ये आदिवासींचे लघुपट पाहिल्यानंतर मुख्य प्रवाहातील प्रत्येकाचा त्यांच्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलेल. हा आमचा ठाम विश्वास आहे.