‘दगडूशेठ गणपती ट्रस्ट’ला हरिद्वार कुंभमेळ्याचे विशेष निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:10 AM2021-02-11T04:10:57+5:302021-02-11T04:10:57+5:30
ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके, कुंभमेळ्याचे दक्षिण भारत समन्वयक विठ्ठल जाधव उपस्थित होते. आद्य ...
ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके, कुंभमेळ्याचे दक्षिण भारत समन्वयक विठ्ठल जाधव उपस्थित होते. आद्य शंकराचार्य यांनी स्थापन केलेल्या १३ आखाड्यांपैकी श्री शंभू पंचअग्नी आखाडा हा प्रमुख आखाडा आहे. श्री गणेश ही प्रथम देवता आहे. त्या श्रीगणेशाच्या देवस्थानांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती आणि महाराष्ट्रातील अष्टविनायक यांना कुंभमेळ्यास यंदा विशेष निमंत्रण दिले आहे.
अष्टविनायक देवस्थानांना निमंत्रित करण्याची जबाबदारी दगडूशेठ गणपती ट्रस्टकडे दिली आहे. श्री शंभू पंचअग्नी आखाडा यांच्यातर्फे दिनांक ११ मार्च, १२ एप्रिल, १४ एप्रिल आणि २७ एप्रिल २०२१ रोजी हरिद्वार येथे शाही स्नान आयोजित केले आहे. त्या शाही स्नानामध्ये देखील दगडूशेठ गणपती आणि अष्टविनायक गणपती देवस्थानांच्या विश्वस्तांना सहभागी करुन घेणार आहे.
प.पू.श्री १०८ महंत लोकेश चैतन्य महाराज म्हणाले, की कुंभमेळ्यामध्ये कोट्यवधी भाविक स्नान करण्याकरिता येतात. प्रयाग, नाशिक आणि हरिद्वार येथे मेळ्याचे आयोजन केले जाते. यंदा हरिद्वार येथे गंगा नदीच्या काठी धर्मध्वज पूजन, कथा, प्रवचन आणि देशभरातून येणाऱ्या संत महंतांसाठी संत संमेलन देखील आयोजित केले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात उत्तम योगदान असल्याने यंदा कुंभमेळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. गणपती मंदिरात मान्यवरांच्या हस्ते आरतीही केली.