विशेष सभा काही मिनिटांतच आटोपली

By admin | Published: June 29, 2015 11:49 PM2015-06-29T23:49:35+5:302015-06-29T23:49:35+5:30

बारामती नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा काही मिनिटातच सर्व विषय मंजूर करून गुंडाळण्यात आली. त्याच दरम्यान, वाढीव हद्दीतील भागांमध्ये सार्वजनिक सुविधा

Special meeting was completed in a few minutes | विशेष सभा काही मिनिटांतच आटोपली

विशेष सभा काही मिनिटांतच आटोपली

Next

बारामती : बारामती नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा काही मिनिटातच सर्व विषय मंजूर करून गुंडाळण्यात आली. त्याच दरम्यान, वाढीव हद्दीतील भागांमध्ये सार्वजनिक सुविधा नसल्याचे कारणावरून विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वखाली काढलेल्या मोर्चात नगरसेवकांबद्दल अपशब्द वापरून घोषणा दिल्या. त्यातून राजकीय हेवेदावे पुढे आल्याने नगरपालिकेतील वातावरण राजकीय दृष्ट्या तापले. ज्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला त्यांनी नंतर वापरलेल्या शब्दाबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
मात्र, शांततेचा भंग केला. जमावबंदीचा आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी आंदोलनासाठी आलेल्या नागरिकांवर कलम १३५ प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यामध्ये नगरसेवक सुनिल सस्ते, भाजपचे शहराध्यक्ष नितिन भामे, रासपचे किशोर मासाळ, आकाश दामोदरे, काँग्रेसचे विरधवल गाडे, शिवसेनेचे राहुल शिंदे आदींचा समावेश होता. ताळेबंद, शहर सुधारणा आराखडा तयार करणे, रस्ते विकास कामांचे टेंडर मंजूर करणे असे ४ विषय होते. या विषयांवर कोणतीही चर्चा न करता थेट सर्व विषय मंजूर झाले, असे जाहीर करण्यात आले. त्यावर राष्ट्रवादीचेच नगरसेवक संजय लालबिगे यांनी सविस्तर चर्चा करावी, अशी मागणी केली. मात्र, त्यांची मागणी धुडकावून लावली. लालबिगे यांनी या विषयाला विरोध नोंदविला. नगरसेविका जयश्री सातव यांनी सर्व विषय मंजूर, असे सांगितल्याबरोबर मंजूर असे जाहीर केले. त्यानंतर राष्ट्रगीताला सुरुवात झाली. लालबिगे यांनी विरोध नोंदवला. तर ज्येष्ठ नगरसेवक सुभाष ढोले यांनी या विषयावर पुन्हा चर्चा करावी, अशी मागणी केली. त्याच दरम्यान नगरपालिकेवर तांदूळवाडी भागातील नागरिकांनी मुलभूत सुविधांसाठी मोर्चा आणला होता. या मोर्चात नगरसेवकाच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्या. या घोषणांमुळे अस्वस्थ झालेल्या नगरसेवकांनी संबंधितांचा निषेध केला. त्याच दरम्यान राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्येच जुंपली. नगरसेवकांना घोषणांमध्ये ‘चोर’ असा उल्लेख केला जात आहे. त्याचा निषेध करावा, असे जाहीर केल्यानंतर सर्व नगरसेवकांनी सभागृहात उभा राहून निषेध नोंदवला. मात्र, राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांनी त्यामध्ये सहभाग घेतला नाही. त्यामुळे वातावरण चिघळले. पक्षांतर्गतच नगरसेवकांनी दुफळी असल्याचे चित्र निर्माण झाले. नगरसेवकांच्या विरोधात घोषणाबाजी झाल्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले.
पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी नगरपालिकेत दाखल झाले. त्यामुळे मोर्चेकऱ्यांमध्ये देखील अस्वस्थता पसरली. मोर्चात सहभागी झालेल्या काही महिलांनी आम्हाला दारूबंदीच्या विरोधात आंदोलन करायचे आहे, असे सांगून बोलावले आहे. यामध्ये आम्हाला काहीही माहिती नाही, असे नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांच्या दालनात उपस्थित नगरसेवकांसमोर सांगितले. त्यामुळे वादात आणखीच भर पडली. याच दरम्यान एका नगरसेविकेच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे देखील नगरसेवकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. बराच काळ वाद सुरू असताना पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी मध्यस्थीची भूमिका पार पाडली. सर्व नगरसेवकांच्या वतीने नगराध्यक्षांना मोर्चेकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी सांगितले. त्यानंतर सभागृहात सर्व विषयाच्या अनुषंगाने चर्चा झाली.
यावेळी किशोर मासाळ, अ‍ॅड. नितिन भामे, अ‍ॅड. आकाश मोरे, आकाश दामोदरे, विरधवल गाडे, पप्पू चव्हाण यांनी विविध विकास कामांमध्ये वाढीव हद्दीत विशेषत: तांदूळवाडीत दुजाभाव केला जातो, असा आरोप केला. त्यावर नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांनी आरोपांचे खंडन केले. नगरपालिकेच्या हद्दीत ५५ किलोमीटरची कामे रस्ते, भूयारी गटारांची घेतली आहेत. नव्याने १२१ रस्त्यांच्या कामाला मंजुरी दिली आहे. मात्र, अगोदर गटार योजना नंतर रस्ते, अशी भूमिका पालिकेची आहे. त्यामुळे कामात दुजाभाव झालेला नाही. तसेच, प्रशासन, पदाधिकारी पारदर्शी कारभार करीत आहेत, असे सांगितले. रस्त्यांची कामांचे टेंडर देताना कमी दराने निविदा मंजूर झाल्या आहेत. त्याचा नगरपालिकेला फायदा झाला, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Special meeting was completed in a few minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.