अविश्वास ठरावासाठी होणार खास सभा
By admin | Published: July 25, 2015 04:21 AM2015-07-25T04:21:06+5:302015-07-25T04:21:06+5:30
आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकाकडून लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्याविरोधात भाजपकडून अविश्वास
पुणे : आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकाकडून लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्याविरोधात भाजपकडून अविश्वास ठराव आणला जाणार आहे. या ठरावावरील निर्णय घेण्यासाठी खास सभेचे आयोजन करावे, असे पत्र मंडळातील भाजपच्या सदस्यांनी गुरुवारी अध्यक्षांना दिले आहे. दरम्यान, हा अविश्वास ठराव ठेवण्यापूर्वी भाजपच्या सदस्यांनी धुमाळ यांना नोटीस पाठविली होती. या नोटिशीला धुमाळ यांनी उत्तर दिले असून, ते समाधानकरक नसल्याने ही सभा बोलावण्याची मागणी भाजपच्या मंडळातील सदस्यांनी केली आहे. भाजपचे सदस्य रघुनाथ गौडा, मंजुश्री खर्डेकर, किरण कांबळे यांच्या त्यावर स्वाक्षऱ्या आहेत.
मागील महिन्यात या बदली प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिक्षण मंडळाच्या एका कर्मचाऱ्याला एका मध्यस्थ व्यक्तीला एक लाख रुपयांची लाच घेताना अटक केली होती. या प्रकरणी धुमाळ आणि माजी अध्यक्ष रवी चौधरी यांच्यावरही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता, तसेच या दोघांना अटकही झालेली होती. त्यामुळे भाजप सदस्यांनी ४ जुलै रोजी शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ यांना नोटीस पाठविली होती. धुमाळ यांनी विहित कालावधीमध्ये या नोटिशीला उत्तरही दिले आहे. परंतु, धुमाळ यांनी केलेला खुलासा मान्य नसल्याने त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी खास सभेचे आयोजन करण्याची मागणी या सदस्यांनी केली आहे.