आदिवासी भागातील मतदान केंद्रांवर संपर्कासाठी विशेष प्लॅन
By admin | Published: February 21, 2017 01:44 AM2017-02-21T01:44:30+5:302017-02-21T01:44:30+5:30
आंबेगाव तालुक्यातील ५ जिल्हा परिषद जागांसाठी २४ तर १० पंचायत समितीच्या जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात उभे असून
घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील ५ जिल्हा परिषद जागांसाठी २४ तर १० पंचायत समितीच्या जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात उभे असून, एकूण १७३४५९ मतदार या उमेदवारांचे भविष्य ठरविणार आहेत. निवडणुकीसाठी २२४ मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून, येथे सर्व कर्मचारी, मतदान साहित्य व मतदान यंत्रणा तपासून केंद्रावर पोहोचले आहेत. तसेच तालुक्याच्या आदिवासी दुर्गम भागाचा विचार करता मतदानकाळात संपर्कासाठी विशेष प्लॅन तयार करण्यात आला असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश भालेदार यांनी सांगितले.
तालुक्यातील १७३४५९ मतदारांमध्ये ८३८६६ स्त्रिया तर ८९५९३ पुरुष आहेत. यामध्ये आमोंडी/शिनोली गटात ३१०६२, घोडेगाव/पेठ गटात ३७५५७, कळंब/चांडोली बुद्रुक गटात ३४३९३, पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक/अवसरी बुद्रुक गटात ३४८९०, मंचर/अवसरी खुर्द गटात ३५५५७ मतदार आहेत.
मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्राच्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी २८ एसटी बस, ४५ जीप व १३ शासकीय जीप ठेवण्यात आल्या होत्या. सर्व साहित्याचे वाटप व जमा करण्याचे काम शासकीय इंग्रजी माध्यमाची आश्रमशाळा घोडेगाव येथे होणार आहे. तहसील कार्यालयात १० स्वतंत्र मोबाईल फोन ठेवण्यात आले आहेत. या भागात जादा मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत, येथे मतदानकाळात झोनल आॅफिसला अडचणी आल्यास घ्यावयाच्या दक्षतेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पोलिसांनी ९ बेकायदा दारूधंद्यांवर कारवाई केली. सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (वार्ताहर)