एमएसआरडीसीच्या रिंगरोडसाठी खास तरतूद; तब्बल १५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 01:58 PM2020-03-07T13:58:02+5:302020-03-07T13:59:18+5:30
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये बाहेरून येणारी वाहतूक शहराबाहेर वळविण्यासाठी १७० किलोमीटर लांबीचा रिंगरोड बांधणार आहे.
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणाऱ्या रिंगरोड प्रकल्पासाठी शासनाने प्रथमच अर्थसंकल्पामध्ये खास तरतूद केली आहे. यामुळे गेल्या १३ वर्षांपासून केवळ चर्चा असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोड प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये बाहेरून येणारी वाहतूक शहराबाहेर वळविण्यासाठी १७० किलोमीटर लांबीचा रिंगरोड बांधणार आहे. यासाठी तब्बल १५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली आहे. शासनाने सन २००७मध्ये पुणे जिल्ह्याच्या प्रादेशिक विकास आराखड्यात रिंगरोड प्रस्तावित करण्यात आला. त्यानंतर सन २०११मध्ये शासनाने एमएसआरडीसीच्या रिंगरोडला मान्यता दिली; परंतु दरम्यानच्या कालावधीत पीएमआरडीएकडूनदेखील एक रिंगरोड प्रस्तावित करण्यात आला. यामध्ये एमएसआरडीसी आणि पीएमआरडीए हे दोन्ही रिंगरोड काही ठिकाणी एकत्र येत असल्याने नक्की कोणता रिंगरोड होणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. यामध्ये पीएमआरडीए आणि एमएसआरडीसी दोघेही आपल्या रिंगरोडसाठी अग्रही होती. अखेर शासनाने एमएसआरडीसीच्या रिंगरोडला हिरवा कंदील दाखविला असल्याची माहिती एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता ए. नागरगोजे यांनी दिली. राज्य शासनाने एमएसआरडीसीच्या पश्चिम भागातील रिंगरोडला ‘विशेष राज्य महामार्ग १’ असा दर्जा दिला आहे. याबाबतची अधिसूचनादेखील शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. यामुळे राज्यात समृद्धी महामार्गानंतर ‘विशेष महामार्गा’चा दर्जा मिळणारा एमएसआरडीसीचा रिंगरोड हा दुसरा महामार्ग ठरला आहे. एमएसआरडीसीकडून दोन टप्प्यांत रिंगरोडचे काम करण्यात येईल. पहिला टप्पा पूर्व भागातील रिंगरोड व दुसरा टप्पा पश्चिम भागातील रिंगरोड करण्यात आला असल्याची माहिती एमएसआरडीसीचे उपविभागीय अभियंता संदीप पाटील यांनी दिली.
........
असा असेल पूर्व
भागातील रिंगरोड
पूर्व भागातील रिंगरोडच्या मार्गाचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यामध्ये हवेली तालुक्यातील भावडी, लोणीकंद, डोंगरगाव, बकोरी, वाडे बोल्हाई, शिरसवाडी, मुरकुटेनगर, गावडेवाडी बिवरी, कोरेगाव मूळ, नायगाव, सोरतापवाडी, तरडे व आळंदी म्हातोबाची अशा १४ गावांतून रिंगरोड जाईल. पुरंदर तालुक्यातील सोनोरी, दिवे, पवारवाडी, हिवरे, चांभळी, गराडे व सोमुर्डी ही ७ गावे, भोर तालुक्यातील कांबरे, नायगाव, केळवडे, साळवडे, वरवे बुद्रुक या ५ गावांचा समावेश आहे. अशा प्रकारे ४ तालुक्यांतील ३० गावांमधून हा पूर्व भागातील रिंगरोड जाणार आहे.
..............
असा असेल पश्चिम भागातील रिंगरोड
भोर तालुक्यातील केळवडे, कांजळे, खोपी, कुसगाव, रांजे या ५ गावांतून, हवेली तालुक्यातील रहाटावडे, कल्याण, घेरासिंहगड, खामगाव मावळ, मालखेड, वरदाडे, मांडवी बुद्रुक, सांगरूण, बहुली या ९ गावांतून, मुळशी तालुक्यातील कातवडी, मुठा, मारणेवाडी, आंबेगाव, उरवडे, कासार आंबोली, भरे, आंबडवेट, घोटावडे, रिहे, पडळघरवाडी, जवळ, केमसेवाडी आणि पिंपळोली अशी १४ गावे आणि मावळ तालुक्यातील पाचाणे, चांदखेड, बेबडओहोळ, धामणे, परंदवाडी, जवळ आणि उर्से अशा ६ गावांचा समावेश आहे. अशा प्रकारे ४ तालुक्यांतील ३४ गावांमधून पश्चिम रिंगरोड जाणार आहे.
.........