डीएसके प्रकरणी विशेष सरकारी वकील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 04:22 AM2017-12-25T04:22:20+5:302017-12-25T04:22:42+5:30
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला असला तरी या खटल्यात सरकारची बाजू खंबीरपणे
पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला असला तरी या खटल्यात सरकारची बाजू खंबीरपणे मांडण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, असा प्रस्ताव पुणे पोलिसांनी शासनाकडे पाठविला आहे़
बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांनी गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ त्याचा तपास गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे सोपविण्यात आला आहे़ आतापर्यंत ३ हजारांहून अधिक गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्या आहेत़ या गुन्ह्याच्या तपासासाठी स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले आहे़ याप्रकरणी मुंबई आणि कोल्हापूर येथेही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ गुंतवणूकदारांबरोबरच डीएसके यांच्याकडे फ्लॅटसाठी नोंदणी केलेल्यांनाही वेळेवर फ्लॅट न दिल्याने त्यांनीही फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़
सर्वोच्च न्यायालयाने सध्या तरी डीएसके यांना एक महिन्यात ५० कोटी रुपये भरण्यासाठी मुदत दिली आहे़ असे असले तरी त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे़ गुंतवणूकदारांचा पैसा व फ्लॅटधारकांचे पैसे नेमके कोठे गेले हे शोधून काढण्यासाठी लेखापरीक्षकाची नेमणूक केली आहे़