अकरावीसाठी विशेष फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 03:21 AM2017-08-10T03:21:39+5:302017-08-10T03:21:39+5:30
इयत्ता अकरावीसाठी महाविद्यालयांमध्ये अद्याप प्रवेश न मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पहिल्या विशेष फेरीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या फेरीची प्रक्रिया दि. ११ आॅगस्टपासून सुरू होणार आहे.
पुणे : इयत्ता अकरावीसाठी महाविद्यालयांमध्ये अद्याप प्रवेश न मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पहिल्या विशेष फेरीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या फेरीची प्रक्रिया दि. ११ आॅगस्टपासून सुरू होणार आहे. फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने पसंतीक्रम पुन्हा नव्याने भरणे आवश्यक आहे. पसंतीक्रम न भरल्यास फेरीत सहभागी होता येणार नाही.
इयत्ता अकरावीमध्ये प्रवेशासाठीची नियमित चौथी फेरी सध्या सुरू आहे. ही फेरी बुधवारी पूर्ण होणार होती; मात्र या फेरीची मुदत गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी काही वेळ मिळणार आहे. या फेरीअखेरपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेश मिळालेला नाही; तसेच प्रवेशासाठी निवड होऊनही अनेक विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेतलेला नाही. काही विद्यार्थ्यांनी अद्याप आॅनलाइन प्रक्रियेतही सहभाग घेतला नाही. पहिल्या पसंतीक्रमानुसार निवड झालेल्या, मात्र प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना ब्लॉक करण्यात आले होते.
विशेष फेरीसाठी दि.१० आॅगस्ट रोजी रिक्त जागांची माहिती व कटआॅफ संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाईल. त्यानंतर दि.११ आॅगस्टपासून आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या फेरीत दहा पसंती क्रम भरणे बंधनकारक आहे. या फेरीमध्ये पूर्वी दिलेले पसंतीक्रम रद्द होतील.
अपूर्ण अर्ज भरता येणार
विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी राबविली जाणार आहे. या फेरीचे वेळापत्रक विभागीय शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी बुधवारी प्रसिद्ध केले. या फेरीत सहभागी होण्यासाठी संबंधित सर्व विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार नवीन अर्ज, अर्जाचा दुसरा भाग, तसेच अपूर्ण अर्ज भरता येणार आहेत.
विशेष फेरीत कोण सहभागी होऊ शकते ?
यापूर्वी प्रवेश घेतलेले विद्यार्थी वगळून सर्व विद्यार्थी
पहिला पसंतीक्रम मिळवूनही प्रवेश न घेतलेले
प्रवेश रद्द केलेले
प्रवेश नाकारलेले
महाविद्यालय अॅलॉट होऊनही प्रवेश न घेतलेले
पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया
संकेतस्थळावर पूर्वीचाच आयडी व पासवर्ड टाकून लॉगीन करणे.
‘माय स्टेटस’मधील रजिस्ट्रेशन फार्म पार्ट २ क्लिक करून विज्ञान विषयातील १०० पैकी गुण भरणे.
त्यानंतर शाखा व माध्यम निवडणे
चॉइस आॅफ सेंट्रलाइज्ड पेजवरील फिल्ड युवर चॉइसेसवर क्लिक करून पसंतीक्रम भरणे.
सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर फॉर्म जमा होईल.
पहिल्या विशेष
फेरीचे वेळापत्रक
दि. १० आॅगस्ट - दुपारी २ वाजेपर्यंत - चौथ्या फेरीतील अॅलॉट झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश
सायंकाळी ५ वाजेपर्यंत - रिक्त जागांची माहिती व कटआॅट प्रसिद्ध करणे
४दि. ११ व १२ आॅगस्ट -
नवीन अर्ज, भाग दोन व अपूर्ण अर्ज भरणे
४दि. १६ आॅगस्ट -
सायंकाळी ५ वाजता - गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे
४दि. १८ व १९ आॅगस्ट -
गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देणे
अर्जाचा भाग १ पूर्ण असलेले, परंतु भाग २ अपूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला मार्गदर्शन केंद्रावर जाऊन भाग एक अप्रुव्ह करून घ्यावा लागेल. त्यानंतर भाग दोन भरता येणार आहे. तसेच, एकदाही आॅनलाइन अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका घेऊन त्यातील आयडी व पासवर्डद्वारे लॉगीन करावे लागणार आहे. त्यानंतर भाग एक भरून मार्गदर्शन केंद्रावर अप्रुव्ह करून घ्यावा लागेल. त्यानंतरही अर्जाचा भाग दोन भरता येईल.