Maha Kumbh Mela 2025: कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाण्यासाठी पुणेकरांना विशेष गाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 13:15 IST2025-02-13T13:14:57+5:302025-02-13T13:15:45+5:30
ट्रेन पुण्यासह सातारा, दौंड, मिरज, सांगली, अहिल्यानगर येथून धावणार

Maha Kumbh Mela 2025: कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाण्यासाठी पुणेकरांना विशेष गाडी
पुणे : प्रयागराज येथील महाकुंभमेळासाठी हुबळी ते वाराणसीदरम्यान सहा फेऱ्या होणार असून, ही ट्रेन पुण्यासह सातारा, दौंड, मिरज, सांगली, अहिल्यानगर येथून धावणार आहे. त्यामुळे येथील प्रवाशांना प्रयागराजला जाण्यासाठी विशेष गाडी उपलब्ध झाली आहे.
प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्याला प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन हुबळी-वाराणसी विशेष ट्रेन धावणार आहे. त्यामध्ये ट्रेन क्रमांक ०७३८३ ही विशेष रेल्वे गाडी दि. १४, २१ आणि २८ रोजी हुबळी येथून सकाळी आठ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता वाराणसी येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०७३८४ ही विशेष गाडी दि. १७ आणि २४ फेब्रुवारी, तर ३ मार्च रोजी वाराणसी येथून सकाळी पाच वाजता सुटेल आणि हुबळी येथे तिसऱ्या दिवशी रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल. या गाडीला एक वातानुकूलित द्वितीय, चार वातानुकूलित तृतीय, ११ शयनयान, १ सामान्य द्वितीय सिटिंग असलेली गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार असेल. ही ट्रेन मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा, पुणे, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड आणि भुसावळमार्गे धावणार आहे.
दानापूरच्या विशेष फेऱ्या वाढल्या
तसेच बीदर ते दानापूर विशेष दोन फेऱ्या, चर्लपल्ली ते दानापूर विशेष चार फेऱ्या आणि मछलीपट्टणम ते दानापूर विशेष चार फेऱ्या असणार आहेत. दरम्यान, मध्य रेल्वे महा कुंभमेळ्यासाठी ४२ विशेष गाड्या चालवत आहे, त्यापैकी १८ फेऱ्या मुंबई ते बनारस/मऊदरम्यान, १२ नागपूर ते दानापूरदरम्यान आणि १२ पुणे ते मऊदरम्यान गाड्या आहेत.