आराेपीला विशेष वागणूक कोणाच्या आशीर्वादाने? ‘त्या’ पोलिसांवरही कडक कारवाई करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 10:06 AM2024-05-22T10:06:45+5:302024-05-22T10:07:42+5:30
दारूच्या नशेत बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना चिरडलेल्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची पोलिस ठाण्यामध्ये बडदास्त राखण्यात आली...
पुणे : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरडल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे हाताळले आहे. दारूच्या नशेत बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना चिरडलेल्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची पोलिस ठाण्यामध्ये बडदास्त राखण्यात आली.
गुन्हा दाखल करताना किरकोळ कलमे लावून तातडीने कोर्टात हजर करून जामीन मिळाला. या प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद दिसत असून अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
दोन तरुणांचा जीव घेतलेला असताना पोलिसांना त्याचे काहीच कसे वाटले नाही? मृतांच्या नातेवाइकांना धमक्या देण्यात आल्याचे पुणे पोलिस आयुक्त आता सांगत आहेत मग पोलिस काय झोपा काढत आहेत का? महाभ्रष्ट युती सरकारच्या काळात राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. पुणे शहराचा सांस्कृतिक व शैक्षणिक नगरी असा लौकिक आहे; पण त्याला काळिमा फासण्याचे काम, या महायुती सरकारने केले आहे, असा आरोपही अतुल लोंढे यांनी केला आहे.