पुण्याच्या एफटीआयआयची गांधीजींना अनाेखी आदरांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 08:46 PM2019-01-31T20:46:44+5:302019-01-31T20:47:47+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यातील फिल्म अँण्ड टेलिव्हिजन इन्स्टीट्युट ऑफ इंडिया (एफटीआयआय) कडून अनाेखी आदरांजली वाहण्यात येत आहे.
पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यातील फिल्म अँण्ड टेलिव्हिजन इन्स्टीट्युट ऑफ इंडिया (एफटीआयआय) कडून अनाेखी आदरांजली वाहण्यात येत आहे. यंदाचे महात्मा गांधीजींचे शताब्दी वर्ष असल्याने एफटीआयआयने स्वातंत्र्यदिनानिमित्त गांधीजींचे गुजरातमधील साबरमती आश्रम साकारले हाेते. तर प्रजासत्ताक दिनानिमित्त राजघाट साकारण्यात आला आहे. अत्यंत रेखीव आणि लक्षवेधून घेणारी ही प्रतिकृती असल्याने नागरिक आवर्जुन दाेन मिनिटे थांबून राजघाटाची प्रतिकृती पाहत आहेत. ही प्रतिकृती 28 फेब्रुवारीपर्यंत नागरिकांना पाहण्यास खुली असणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून एफटीआयआय ही संस्था वादाचे केंद्र झाली हाेती. 2016 पासून एफटीआयआयकडून संस्थेच्या प्रवेशद्वारासमाेर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला भारतातील महत्त्वाच्या ठिकाणांच्या प्रतिकृती साकारण्यात येतात. यात संस्थेच्या विद्यार्थ्यांचा देखील सहभाग असताे. यंदा महात्मा गांधींचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने गांधीजींच्या आयुष्यातील महत्त्वाच्या ठिकाणांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या. राजघाटच्या प्रतिकृतीमधून सत्य, अहिंसा, सामाजिक न्याय याचा संदेश देण्याचा प्रयत्न एफटीआयआयकडून करण्यात आला आहे.
एफटीआयआयचे संचालक भुपेंद्र कॅन्थाेला म्हणाले, दिल्लीच्या राजघाटची प्रतिकृती 26 जानेवारीपासून नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे. पुण्यातील अनेक शाळांनी या ठिकाणाला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या प्रतिकृतीच्या माध्यमातून आम्ही गांधीजींच्या अहिंसा, सत्य आणि सामाजिक न्यायाचा संदेश देत आहाेत. 28 फेब्रुवारीपर्यंत ही प्रतिकृती नागरिकांना माेफत पाहण्यासाठी खुली असणार आहे.