Pune| आजपासून दर शनिवारी, बुधवारी लसीकरणाची विशेष मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 01:19 PM2022-07-23T13:19:13+5:302022-07-23T13:22:39+5:30
पुण्यात लसीकरणाची विशेष मोहीम....
पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा उपक्रम राबविण्यात येत असून त्याला अधिक वेग देण्यासाठी आता तालुका आरोग्य अधिकारी हे तालुकास्तरावर नोडल अधिकारी म्हणून काम करणार आहेत, तर जिल्हास्तरावर जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी जिल्हा नोडल अधिकारी असतील. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यानुसार २३ जुलैपासून दर शनिवारी व बुधवारी लसीकरणाच्या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार १५ जुलै ते ३० सप्टेंबर या ७५ दिवसांच्या काळात कोरोनाचा बूस्टर डोस देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हिटी दर जास्त असल्याने जिल्ह्यात लसीकरणावर विशेष भर देण्यात येत आहे. त्याला अधिक वेग येण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी कोविन पोर्टलवरून प्रलंबित लाभार्थ्यांची यादी करायची आहे.
शनिवार अर्थात २३ जुलैपासून दर शनिवारी व बुधवारी लसीकरणाच्या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. हे लसीकरण शाळा, महाविद्यालये, आठवडी बाजार येथे आयोजित केले जातील. बूस्टर डोस प्रलंबित असणाऱ्यांना फोन करून डोस घेण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. तसेच आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व इतर विभागाचे कर्मचारी अशा लाभार्थ्यांना घरी जाऊन मोहिमेत सहभागी करून घेणार आहेत. याव्यतिरिक्त अन्य दिवशी नेहमीप्रमाणे लसीकरण होणार आहे. तसेच गणेशोत्सवामध्ये गणेश मंडळांच्या सहकार्याने सर्व गावांमध्ये विशेष लसीकरण शिबिरे घेण्यात येणार आहेत.
जिनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुने पाठवणार
पुणे जिल्ह्याचा सध्याचा पॉझिटिव्हिटी दर २०.६ टक्के आहे. यासाठी लक्षणे असणाऱ्यांची चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच सारी व अन्य तत्सम रोगांची लक्षणे असलेल्यांची माहिती गोळा करण्यात येणार आहे. ही माहिती दैनंदिन स्वरूपात पोर्टलवर भरली जाईल. तसेच आरोग्य सहायक त्याचा पाठपुरावा करणार आहेत. कोरोनाच्या उपप्रकारांबाबत माहिती मिळावी, या उद्देशाने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुने पाठवावे लागणार आहेत. त्यासाठी नियमितपणे आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात, असे आदेश देशमुख यांनी दिले आहेत.