कैद्यांकडून दिवाळीसाठी कपड्यांना विशेष साज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 01:41 AM2018-10-31T01:41:52+5:302018-10-31T01:42:11+5:30
खास दिवाळीनिमित्त येरवडा कारागृह कारखाना विक्री केंद्रामध्ये कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेते मुकेश ऋषी यांच्या हस्ते करण्यात आले.
पुणे : विविध गुन्ह्यांची शिक्षा भोगत असलेले पुण्यातल्या येरवडा कारागृहातले कैदी दुसऱ्यांचे घर प्रकाशमान करीत आहेत. खास दिवाळीनिमित्त येरवडा कारागृह कारखाना विक्री केंद्रामध्ये कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेते मुकेश ऋषी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभिनेते नागेश भोसले, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, कारागृह मुख्यालयाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, कारागृहाचे अधीक्षक यू. टी. पवार आदी उपस्थित होते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून कैद्यांनी दिवाळीनिमित्त तयार केलेल्या वस्तू नागरिकांना खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
गेल्या १० वर्षांपासून पुण्यातल्या येरवडा कारागृहाच्या विक्री केंद्रामध्ये कैद्यांनी दिवाळीनिमित्त तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात येते. अनेकदा रागाच्या भरात हातून एखादा गुन्हा घडतो आणि त्याची शिक्षा आयुष्यभर भोगावी लागते. कैदीसुद्धा समाजाचा एक घटक आहेत. त्यांना शिक्षा भोगल्यानंतर समाजात मानाने जगता यावे, तसेच त्यांना एक रोजगाराचे साधन निर्माण व्हावे, या हेतूने कारागृहाच्या माध्यमातून कैद्यांना विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. यात गृहोपयोगी सर्व प्रकारच्या वस्तूंचा समावेश आहे. दिवाळीनिमित्त खास कैद्यांनी आकाशकंदील, पणत्या, फराळाचे पदार्थ, तसेच इतर वस्तू तयार केल्या आहेत. सुबक आणि आकर्षक अशा या वस्तू तयार करण्यात आल्या आहेत.
नागेश भोसले म्हणाले, की हे प्रदर्शन पाहिल्यावर लक्षात आलं, की कारागृहाच्या जगातसुद्धा अनेक छोटेछोटे उद्योग आहेत. कारागृहात कैद्यांचं एक वेगळं जग आहे, त्यात त्यांची मेहनत, काम आणि कला आहे. कैदी हासुद्धा एक माणूस असतो. हातून एखादा गुन्हा घडतो आणि त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागते. परंतु आज या वस्तू पाहिल्यानंतर आपल्यातीलच ही माणसं किती प्रतिभावान आहेत, याचा प्रत्यय येतो.
सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, की साधारण १२ वर्षांपूर्वी मी येरवडा कारागृहामध्ये नृत्य सादरीकरण केले होते. आज पुन्हा येथे येण्याची संधी मिळत आहे. कैद्यांमधील अवगुण पोलिसांकडून मारण्यात येत आहेत, पण त्यांच्यातील गुण पोलीस मारत नाहीत, ही खूप चांगली गोष्ट आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांच्यातील गुणांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे.
इथे येऊन या वस्तू पाहिल्यावर खूप आनंद झाला. कारागृह म्हटलं, की एक वेगळंच चित्र आपल्या डोळ्यासमोर तयार होत असतं. चुका सगळ्यांकडून होत असतात. परंतु या चुका सुधारण्यासाठी आपल्याला एका चांगल्या व्यक्तीची गरज असते. कैद्यांच्या आयुष्यात ती व्यक्ती म्हणजे कारागृहातील पोलीस कर्मचारी आहेत. कैदी ज्या वस्तू तयार करीत आहेत, जी मेहनत घेत आहेत याची आम्हा सर्वांनाच कदर आहे.
- मुकेश ऋषी