राज्यातील ५२८ मंदिरांमध्ये जाण्यासाठी कपड्यांची विशिष्ट अट, महाराष्ट्र मंदिर महासंघाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 01:45 PM2024-03-16T13:45:46+5:302024-03-16T13:46:16+5:30
पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर यांसह ७१ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे...
पुणे : मंदिरांचे पावित्र्य जपणे आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार होण्यासाठी पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर यांसह ७१ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील सुमारे ५२८ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी हिंदू जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक पराग गोखले, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे जिल्हा निमंत्रक हभप चोरघे महाराज, कसबा गणपती मंदिराच्या विश्वस्त संगीता ठकार, कन्हे पठार खंडोबा मंदिर देवस्थानचे विश्वस्त मंगेश जेजुरीकर, चतुःश्रृंगी देवस्थानचे नंदकुमार अनगळ इ. उपस्थित होते. राज्य सरकारने २०२० मध्ये राज्यातील सर्वच सरकारी कार्यालयात वस्त्रसंहिता लागू आहे. देशभरातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खासगी आस्थापने, शाळा-महाविद्यालय, न्यायालय, पोलिस ठाणे आदी क्षेत्रांत वस्त्रसंहितेचे नियमानुसार आचरण होत आहे.
या धर्तीवर हिंदुंच्या मंदिरांचे पावित्र्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे पुणे जिल्ह्यातील ७१ मंदिरांच्या विश्वस्तांनी त्या मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सुनील धनवट यांनी सांगितले.