मेट्रो रिच ३ मार्गाच्या कामाला मिळणार गती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 10:00 PM2020-01-28T22:00:00+5:302020-01-28T22:00:02+5:30
प्रिकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करून ते गतिमान करण्याचा महामेट्रोचा प्रयत्न
पुणे : आगाखान पॅलेस कि कल्याणीनगर या वादात रखडलेल्या मेट्रो च्या दिवाणी न्यायालाय ते रामवाडी या मार्गाच्या कामाला आता गती मिळणार आहे. मेट्रोच्या खांबांच्या ज्या विस्तारीत भागावरून मेट्रो धावणार आहे ते विस्तारीत भाग (पिअर आर्म)आता प्रीकास्ट (आधीच तयार करून) करून बसवण्यात येणार आहे. त्यामुळे मेट्रो मार्गाच्या या रखडलेल्या रिच ३ भागाचे काम गतीने होईल.
वनाज ते रामवाडी या १६ किलोमीटरच्या मेट्रो मार्गाच्या दिवाणी न्यायालय ते रामवाडी या भागाला मेट्रो रिच ३ असे म्हटले जाते. या मार्गाचा काही भाग आगाखान पॅलेस समोरून जात होता. त्याला संसदेच्या पुरात्तत्व वास्तू संरक्षण समितीने हरकत घेतली. त्यानंतर तो तिथून वळवून १ किलोमीटरचा वळसा घेत कल्याणीनगर मधून नेण्यात आला. त्याला कल्याणीनगर मधील रहिवाशांनी हरकत घेतली. राष्ट्रीय हरित प्राधिकरणात दावा दाखल केला. न्यायालयात याचिका केली, मात्र त्यांची हरकत फेटाळली गेली. त्यामुळेच रखडलेल्या या संपुर्ण मार्गाचे कामातील बहुतेक अडथळे आता दूर झाले आहेत. प्रिकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करून ते गतीमान करण्याचा महामेट्रोचा प्रयत्न आहे. त्यादृष्टिने कामाचे नियोजन करण्यात येत आहे.
संगमवाडी व बंडगार्डन येथे मुठा व मुळामुठा अशा दोन नद्या ओलांडून हा मार्ग जातो. त्याशिवाय एक रेल्वे क्रॉसिंगही आहे. तसेच आरटीओ ते बंडगार्डन हा रस्ता अरूंद आहे व तिथे वाहतूकीचे प्रमाण बरेच मोठे आहे. संपुर्ण मार्गावर एकूण ३१९ खांब आहेत. त्यातील १६ खांब नदीपात्रात आहेत. या खांबांचा विस्तारीत भाग (पिअर आर्म) आता कास्टींग यार्ड मध्ये प्रिकास्ट करून प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी आणला जातो व क्रेनच्या साह्याने बसवला जातो. या एका भागाचे वजन २१ टनापेक्षा जास्त आहे. त्याला बसवताना लागणारी क्रेनही अशीच अवजड असल्याने हे सर्व काम रात्री १२ ते सकाळी ५ या वेळातच केले जाते, मात्र आता प्रिकास्ट पिअर आर्म बसवत असल्याने कामाची गती वाढली आहे.
--------------------
एकूण ४१ टक्के काम पुर्ण
एकूण ३१९ खांबापैकी आता १२५ खांबाचे काम पुर्ण झाले आहे. बाकी ठिकाणी फौंडेशन घेण्याचे काम सुरू आहे. खांब जमिनीपासून पुरेसे वर आले की त्यानंतर रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बांजूना लावलेल्या पत्र्याच्या शेड काढून टाकण्यात येतील, त्यानंतर रस्ता पुन्हा पुर्वीसारखा होईल. एकूण ४१ टक्के काम पुर्ण झाले आहे.
प्रकाश वाघमारे, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, रिच३