मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरात जड वाहनांना वेगमर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 02:17 PM2023-07-19T14:17:36+5:302023-07-19T14:19:48+5:30

नवले पुलाखाली भुयारी मार्ग आवश्यक......

Speed limit for heavy vehicles in Navle Bridge area on Mumbai-Bangalore National Highway | मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरात जड वाहनांना वेगमर्यादा

मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरात जड वाहनांना वेगमर्यादा

googlenewsNext

पुणे : मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी आता सर्व प्रकारच्या जड वाहनांवर कात्रज बोगदा ते नवले पूलदरम्यान ४० किमी वेगमर्यादा आणली आहे. याबाबत वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी आदेश काढले आहेत. कात्रज बोगदा ते नवले पूल या दरम्यान वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या जड, अवजड (ट्रॅक्टर-ट्रेलर, ट्रक-टेलर, अर्टिक्युलेटेड व्हेईकल्स, मल्टी ॲक्सल वाहने, कंटेनर, मोठ्या आकाराची मालाची वाहतूक करणारे वाहने) वाहनांकरिता ताशी ४० किमी वेगमर्यादा निश्चित करण्यात येत आहे, असे आदेशात म्हटले आहे.

नवले पुलाजवळ होणारे सतत अपघात, सेवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी, अपूर्ण सेवा रस्ते, त्यामुळे होणारी अपघातांची मालिका, यामध्ये निष्पाप नागरिकांचे जाणारे बळी यावर ठोस उपाययोजना करण्यासंदर्भात ''लोकमत''ने वारंवार पाठपुरावा केला. पुणे-सातारा महामार्गावरील नऱ्हे येथे वाढत्या अपघातांची संख्या ही एक तीव्र समस्या बनली आहे. तसेच कात्रज चौकाजवळ दोन भुयारी मार्ग करणे गरजेचे असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये लोकसभेत सांगितले. याला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, पुणे-सातारा महामार्गावरील अपघातांची समस्या गंभीर आहे, हे खरे आहे. या महामार्गावर चार पूल होत आहेत. यामध्ये येणाऱ्या २५ दिवसांत एक पूल तयार होईल. बाकीचे तीन पूल हे जूनपर्यंत तयार होतील. हे चार पूल तयार झाल्यानंतर ही समस्या कमी होईल. तसेच सर्व कामे लवकर पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रशासन याकडे लक्ष देत असून, येत्या सहा महिन्यांत ही सर्व कामे पूर्ण होतील, असे गडकरी यांनी सांगितले होते. मात्र, २१ महिन्यानंतरही अद्याप येथील कामे पूर्ण झाली नाहीत.

नवले पुलाखाली भुयारी मार्ग आवश्यक...

वडगाव बुद्रुक, नऱ्हे गावाच्या हद्दीतून जाणारा राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता जांभूळवाडी बोगद्यामार्गे मुंबई - बंगळुरू असा आहे. गेल्या २५ वर्षांपासून शेकडो लोकांचे बळी नवले पूल, कात्रज रस्ता, नऱ्हे येथील महामार्गावर गेले आहेत. गेल्या दोन महिन्यांत या परिसरात मोठ्या अपघातांचे सत्र सुरू असून, असंख्य निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. सध्या रोज नवले पुलाखाली वाहतूक कोंडी होत असून, याठिकाणी एक भुयारी मार्ग करणे गरजेचे असल्याचे मत माजी नगरसेवक हरिदास चरवड यांनी ''लोकमत''शी बोलताना व्यक्त केले.

Web Title: Speed limit for heavy vehicles in Navle Bridge area on Mumbai-Bangalore National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.