कात्रज बोगदा-नवले पुलादरम्यान जड वाहनांना नवीन वेगमर्यादा; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 08:29 AM2023-05-17T08:29:32+5:302023-05-17T08:31:49+5:30

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सरासरी ३०० वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे...

Speed limit for heavy vehicles increased from 60 to 40 between Katraj Bogda and Navale bridge | कात्रज बोगदा-नवले पुलादरम्यान जड वाहनांना नवीन वेगमर्यादा; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

कात्रज बोगदा-नवले पुलादरम्यान जड वाहनांना नवीन वेगमर्यादा; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

googlenewsNext

पुणे :पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल दरम्यान जड वाहनांसाठी वेगमर्यादा ६० वरून ४० किलोमीटर प्रतितास इतकी घटवण्याची अधिसूचना तत्काळ काढण्यात येईल, अशी माहिती अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. याबाबत खेड शिवापूर पथकर प्लाझा येथे सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीवरून वाहतूक नियमांची जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सरासरी ३०० वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे.

रस्ता सुरक्षा समितीच्या वतीने सुचविलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा आढावा बैठकीत त्यांनी या सूचना केल्या. शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, तसेच ‘सेव्ह लाईफ फाउंडेशन’ संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

...तर परवाने रद्द होणार :

व्यवसायाला लाभ व्हावा यासाठी काही हॉटेलचालक तसेच अन्य व्यावसायिक मुख्य मार्गिका आणि सेवारस्ता यामधील डिव्हायडर तोडत असल्याचे निदर्शनास आले आहे. सेवा रस्त्यावरील वाहन अचानक थेट मुख्य मार्गिकेवर तसेच मार्गिकेवरील वाहन अचानक वळत असल्यामुळे अपघात होऊ शकतात. त्यामुळे या व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाईची शिफारस करावी. गरज पडल्यास संबंधितांचे व्यवसाय परवानेही रद्द करण्यात येतील, असेही डाॅ. देशमुख यांनी सांगितले.

दररोज ३०० वाहनांवर कारवाई :

कात्रज नवीन बोगद्याच्या अलीकडे जांभुळवाडीनजीक पोलिस चौकी स्थापन केली आहे. या रस्त्यावर २४ तास १० अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच पोलिस वाहनांद्वारे गस्त घालण्यात येत असून त्याचा चांगला परिणाम झाला आहे. या टप्प्यात विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दररोज सरासरी ३०० वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती मगर यांनी दिली.

इंटरसेप्टर वाहनासाठी प्रस्ताव द्या :

वेगमर्यादा तसेच अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना रोखून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ग्रामीण पोलिस आणि शहर वाहतूक विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे इंटरसेप्टर वाहनासाठीचा प्रस्ताव तत्काळ द्यावा. या रस्त्यावर प्रत्येक मार्गिकेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून ते पोलिस विभागाच्या सॉफ्टवेअरशी जोडावेत, जेणेकरून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करता येईल, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

नगर रस्त्याचाही अभ्यास :

रस्त्यावर ब्रेक निकामी झालेल्या वाहनांना रस्त्यावरून बाजूला जाण्यासाठी इमर्जन्सी एस्केप प्लॅनअंतर्गत बाहेर पडण्याचे ठिकाण (एक्झिट रॅम्प) तयार करण्याबाबत पाहणी केल्याचे कदम यांनी सांगितले. याबाबत आवश्यक तो अभ्यास करून या प्रस्तावाला संबंधित यंत्रणेची मान्यता घ्यावी, असे निर्देश डाॅ. देशमुख यांनी दिले. या वेळी नगर रस्त्यावरील अपघात रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या रस्त्यावरील अपघाताची ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) निश्चित केली असून उपाययोजनांविषयी कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Speed limit for heavy vehicles increased from 60 to 40 between Katraj Bogda and Navale bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.