पूर्वतयारी बैठकांना वेग

By admin | Published: December 13, 2015 02:57 AM2015-12-13T02:57:22+5:302015-12-13T02:57:22+5:30

स्मार्ट सिटीसाठी सरकारच्या निर्देशावरून सोमवारी (दि. १४) होत असलेल्या खास सभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीची उद्या (रविवार) स्वतंत्र बैठक

The speed at the preparatory meetings | पूर्वतयारी बैठकांना वेग

पूर्वतयारी बैठकांना वेग

Next

पुणे : स्मार्ट सिटीसाठी सरकारच्या निर्देशावरून सोमवारी (दि. १४) होत असलेल्या खास सभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीची उद्या (रविवार) स्वतंत्र बैठक होत असून, त्यात या योजनेला कोणत्या उपसूचना द्यायच्या याबाबत चर्चा होणार आहे. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर भाजपाच्या राज्यस्तरावरील काही नेत्यांनी संपर्क साधला असून, त्यातून त्यांचा विरोध सौम्य होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेना मात्र आपल्या विरोधाशी ठाम आहेत.
केंद्र सरकारच्या या योजनेचा प्रस्ताव लांबणीवर टाकून पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी व काँग्रेसने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बरोबर घेत भाजपावर राजकीय खेळी केली होती. प्रस्तावातील कंपनीच्या सूचनेला त्यांचा विरोध असून, त्यामुळे पालिकेची स्वायत्तता कमी होणार असल्याची टीका त्यांच्याकडून होत आहे. मात्र आयुक्त कुणाल कुमार यांच्या माध्यमातून राज्य सरकारमार्फत १४ डिसेंबरला सभा घेण्याचे आदेश आणून भाजपाने काँग्रेस-राष्ट्रवादीवर राजकीय कुरघोडी केली. त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून आता सोमवारच्या सभेत या प्रस्तावाला उपसूचना आणण्याचा विचार सुरू आहे. मनसेनेही शुक्रवारी (दि. ११) सकाळी आपल्या सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना योजनेच्या विरोधात सभागृहात बोलण्यास मुद्दे दिले आहेत.
काँग्रेसची बैठक उद्या सकाळी ११ वाजता काँग्रेस भवन येथे होत आहे. पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांनी ही बैठक आयोजित केली आहे. राष्ट्रवादीची बैठक माजी उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत. त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री गिरीश बापट यांनी या योजनेला राष्ट्रवादीचा बिनशर्त पाठिंबा मिळावा यासाठी चर्चा केली असल्याची माहिती मिळाली. पवार यांनी नगरसेवक, पदाधिकारी यांच्याकडून माहिती घेऊन नंतर काय ती भूमिका घेऊ असे त्यांना सांगितले आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्मार्ट सिटी योजनेतील सर्व त्रुटी तसेच भाजपा त्याचा शहरात उठवत असलेला राजकीय फायदा पवार यांच्यासमोर मांडण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, भाजपानेही आपली व्यूहरचना सुरू केली आहे. सभागृहातील भाजपाचे सदस्यबळ इतर पक्षांच्या तुलनेत फार नाही. त्यामुळेच सभागृहात योजनेच्या विरोधात बोलणाऱ्यांचे मुद्दे खोडून काढून त्यांना पुण्याच्या विकासाचे मारेकरी म्हणून उघड करण्याचे डावपेच आखले आहेत.

Web Title: The speed at the preparatory meetings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.