पुण्यातील नदीसुधार प्रकल्पाला मिळणार गती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 11:33 AM2019-03-13T11:33:47+5:302019-03-13T11:38:27+5:30
गेली अनेक वर्ष रखडलेल्या जायका प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
पुणे: शहरातील बहुचर्चीत व प्रतिक्षित नदी सुधार प्रकल्पाची (जायका) च्या ग्लोबल निविदा मंगळवार (दि.१२) रोजी उघडण्यात आल्या. आता येत्या आठ दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण करून पुढील प्रक्रियेसाठी व निविदा अंतिम करण्यासाठी हा प्रस्ताव जपान इंटरनॅशन कॉपोर्रेशन एजन्सीकडे (जायका) पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या दोन-अडीच महिन्यांत सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी दिली.
गेली अनेक वर्ष रखडलेल्या जायका प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या प्रकल्पाच्या भूसंपादनापाठोपाठ साधारणपणे एसटीपी प्लॅन उभारण्यात येणार आहेत. यासाठी सल्लागर नियुक्त करण्यात आले असून, भूसंपादनाची प्रक्रिया रखडल्याने प्रकल्पाचे काम देखील रखडले होते. परंतु केंद्रीय पर्यावरण खात्याच्या आक्षेपामुळेही अडचणी निर्माण झाल्या. सन २०१४ च्या निवडणुकीमध्ये रखडलेला जायका प्रकल्प प्रचाराचा मोठा मुद्दा ठरला होता. यामुळे सन २०१९ च्या निवडणुका जाहिर होण्यापूर्वी सत्ताधारी भाजपकडून जायकाचे काम सुरु होईल अशी अपेक्षा होती. यासाठी प्रयत्न देखील सुरु होते. परंतु निविदा जागतिक दर्जाच्या (ग्लोबल) असल्याने काही वेळ गेला. अखेर आता या निविदा उघडण्यात आल्या असून, निवडणुका पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे अधिका-यांनी स्पष्ट केले.
जायका प्रकल्पासाठी उघडण्यात आलेल्या निविदा जागतिक दर्जाच्या असल्याने व आचारसंहिता लागण्यापूर्वी निविदा जाहीर करण्यात आल्याने मंगळवारी या निविदा उघडण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता सर्व प्रक्रिया पूर्ण करुन प्रस्ताव जपानला पाठविण्यात येईल. त्यानंतर निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर कामाची वर्क ऑर्डर देण्यात येईल, असे शर्मा यांनी स्पष्ट केले.