'स्वच्छ' सर्वेक्षणाचा 'अशुद्ध' फलक ; पुण्यातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 04:55 PM2020-01-24T16:55:47+5:302020-01-24T16:59:43+5:30
स्वच्छ सर्वेक्षणाचा अस्वच्छ फ्लेक्स साेशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
पुणे : स्वच्छ सर्वेक्षण 2020 सुरु असल्याने पुणे महानगरपालिकेकडून अनेेक उपाययाेजना करण्यात येत आहेत. शहरात विविध ठिकाणी सुशाेभिकरणाचे काम जाेरदार सुरु असून स्वच्छता कर्मचाऱ्यांना देखील जास्तीचे काम दिले जात आहे. अशातच या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नागरिकांना सहभागी करुन घेण्यासाठी ठिकठिकाणी पालिकेकडून फ्लेक्स देखील लावण्यात आले हाेते. असाच एक 'अशुद्ध' लेखनाचा फ्लेक्स साेशल मीडियावर व्हायरल हाेत आहे.
हडपसर येथे पुणे महानगरपालिकेकडून एक अशुद्ध मराठी लिहीलेला फ्लेक्स लावण्यात आला हाेता. ''स्वच्छ व सुंदर ठेवताे आमचा परिसर, स्वच्छतेबाबत जागरुक आहाेत आम्ही पुणेकर'' असे त्या फ्लेक्सवर लिहीण्यात आले हाेते. परंतु हे संपूर्ण वाक्यच या फ्लेक्सवर अशुद्ध छापण्यात आले हाेते. अनेकांनी या फ्लेक्सचा फाेटाे साेशल मीडियावर व्हायरला केला हाेता. महापालिकेला ही गाेष्ट लक्षात येताच त्यांना हा फ्लेक्स उतरवला आहे.
याबाबत बाेलताना महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर माेळक म्हणाले, ''अशुद्ध लेखनाचा फ्लेक्स लागल्याचे लक्षात येताच ताे काढून टाकण्यात आला आहे. ज्या ठेकेदाराला ताे फेक्स लावण्यास सांगितले हाेते त्याच्याकडून पीडीएफ फाईल डाऊनलाेड करताना हा घाेळ झाला हाेता. चूक लक्षात येताच तातडीने फ्लेक्स काढून टाकण्यात आला आहे.''