मार्चअखेर संपूर्ण निधी खर्च करा, कामकाजाचा घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:26 AM2017-11-20T00:26:15+5:302017-11-20T00:26:20+5:30
बारामती : शासनाच्या विविध योजना जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत राबविण्यात येत असतात.
बारामती : शासनाच्या विविध योजना जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत राबविण्यात येत असतात. या योजनांची अंमलबजावणी करण्याच्या कामाला गती देण्यात यावी. योजनांतर्गत मंजूर कामांकरिता निविदा प्रक्रिया तत्काळ पूर्ण करा, तसेच मार्च २०१८ अखेर संपूर्ण निधी खर्च करण्याच्या सूचना प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिल्या.
पंचायत समिती, बारामती येथील सभागृहात पंचायत समितीअंतर्गत विविध विभागांची कामकाज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी पंचायत समिती सभापती संजय भोसले, उपसभापती श्रीमती शारदा खराडे, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, प्रमोद काकडे, पंचायत समिती सदस्य राहुल भापकर, भारत गावडे, रोहित कोकरे, श्रीमती मेनका मगर, श्रीमती लीलाबाई गावडे, गट विकास अधिकारी प्रमोद काळे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी उपस्थित होते. प्रांताधिकारी निकम यावेळी म्हणाले की, तालुक्यात आमदार, खासदार फंडातून मंजूर झालेला निधी वेळेत खर्च झाला पाहिजे. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनी योजनांच्या अंमलबजावणीकरिता नियोजन करावे. तालुक्यातील ग्रामपंचायतींची घरपट्टी, पाणीपट्टी १०० टक्के वसुलीसाठी ग्रामविकास अधिकारी यांना टार्गेट देण्यात यावे. जास्त थकबाकी असेल तर त्यांना समान हप्ते बांधून देऊन वसुली करण्यात यावी.
पाणीपुरवठा विभागास टंचाई आराखडा तत्काळ सादर
करण्याच्या सूचना दिल्या. टंचाई आराखड्यामध्ये टँकर बंद करण्याच्या दृष्टीने विहिरी, पाइपलाइन यांचा समावेश करावा. पाणीपुरवठ्याच्या योजना कार्यान्वित करण्याच्या सूचना निकम यांनी दिल्या.
या विभागामार्फत पूर्ण व प्रगतिपथावर असलेल्या कामांसंदर्भात माहिती घेण्यात आली. योजनांच्या अंमलबजावणीसाठी येणाºया अडचणी जाणून घेऊन त्याचे निराकरण निकम यांनी या वेळी केले.जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांनी
आपल्या मतदार कार्यक्षेत्रात प्रस्तावित कामकाजावर चर्चा केली. काही आवश्यक बदल सुचवून कामांना गती देण्याची अपेक्षा
व्यक्त केली.
पंचायत समितीअंतर्गत बांधकाम, घरकुल योजना, कृषी, शिक्षण, छोटे पाटबंधारे, जलसंधारण विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. गटविकास अधिकारी काळे यांनी पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणाºया योजनांविषयी माहिती दिली. तसेच, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांकडून प्राप्त सूचनांचे पालन करण्यात येऊन, त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.