स्पाईस जेट विमानाने घेतली गगनभरारी; 'कोविशिल्ड' लस पोहचली थेट दिल्ली दरबारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 12:59 PM2021-01-12T12:59:18+5:302021-01-12T13:09:10+5:30

देशात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात केली जाणार

Spice jets take to the skies; Covishield vaccine reaches Delhi | स्पाईस जेट विमानाने घेतली गगनभरारी; 'कोविशिल्ड' लस पोहचली थेट दिल्ली दरबारी

स्पाईस जेट विमानाने घेतली गगनभरारी; 'कोविशिल्ड' लस पोहचली थेट दिल्ली दरबारी

Next

पुणे : सिरम इन्स्टिटयूटची निर्मिती असलेली कोविशिल्ड लस देशांतर्गत वापरासाठी उपलब्ध केली आहे. मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ३ कंटेनर लोहगाव विमानतळाकडे रवाना झाले आणि पुण्यासह देशात एकच उत्साह आणि आनंदाचे वातावरण तयार झाले. केंद्र शासनाने केलेल्या घोषणेनुसार देशात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. त्याच धर्तीवर सिरम इन्स्टिटयूटने कोविशिल्ड लसीच्या उत्पादन व वितरणाने जोर पकडला आहे. 

कोरोना महामारीवर उपयुक्त ठरणाऱ्या या बहुप्रतिक्षित लसीची जगभरातील नागरिक मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आवश्यक ते सर्व सरकारी सोपस्कार पार पाडत ʻसिरमʼ कंपनीने ही लस देशांतर्गत नागरिकांना वापरासाठी आजपासून उपलब्ध करून दिली.कंपनीच्या मांजरी येथील कार्यालयाच्या प्रांगणात, कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंटेनरची पूजा केल्यानंतर या 'कोल्ड चेन व्हॅन' लोहगाव विमानतळाकडे रवाना झाल्या.त्यानंतर 'स्पाईस जेट'च्या कंपनीचे विमान दिल्लीच्या दिशेने झेपावले आणि सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तिथे दाखल देखील झाले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीसह देशातील १३ ठिकाणी ही लस कंटेनरमार्फत पोहचवली जाणार आहे. त्यात कोलकाता, चेन्नई, बंगळुरू अहमदाबाद, कर्नाटक, हैदराबाद, विजयवाडा, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर आदी शहरांचा सहभाग आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईकडे देखील कोविशिल्ड लस पाठवण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात, या लसीचा वापर हा प्रामुख्याने कोरोना वॉरियर्ससाठी करण्यात येणार आहे. कंपनीला सुरवातीला, २ कोटी डोसची ऑर्डर मिळाली आहे. त्यापैकी ६५ लाख डोस आज देशभरातील विविध राज्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले.
लस वाहतुकीसाठी विशेष प्रकारच्या कोल्ड चेन व्हॅन वापरण्यात आल्या. ही लस २ ते ८अंश सेल्सियस इतक्या तापमानात ठेवणे आवश्यक असल्याने या व्हॅनमधून तितके तापमान नियंत्रित करण्यात आले आहे. कंपनीच्या स्वत:च्या आणि भाडे तत्वावरील व्हॅन लस वाहतुकीसाठी वापरण्यात आल्या.

Web Title: Spice jets take to the skies; Covishield vaccine reaches Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.