प्रवासी पुण्यात सामान पाटण्यात ! स्पाईसजेटचा अजब कारभार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 03:00 PM2018-07-05T15:00:30+5:302018-07-05T15:12:53+5:30
विमानाने प्रवासी पुण्यात आले तरी त्यांचे सामान मात्र पाटण्यातच ठेवण्याचा पराक्रम स्पाईसजेट कंपनीने केला आहे. प्रवाशांना या प्रकारच्या बदलांची कोणतीही कल्पना न दिल्याने मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
पुणे : विमानाने प्रवासी पुण्यात आले तरी त्यांचे सामान मात्र पाटण्यातच ठेवण्याचा पराक्रम स्पाईसजेट कंपनीने केला आहे. प्रवाशांना या प्रकारच्या बदलांची कोणतीही कल्पना न दिल्याने मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
पाटणा ते पुणे अशी नवी विमानसेवा पाच दिवसांपूर्वी सुरु करण्यात आली. मोठे अंतर काही तासात पार होणार असल्याने अनेकांनी त्याबद्दल आनंदही व्यक्त केला होता.त्यानंतर आज सकाळी १० वाजता पाटण्याहून एसजी ३७६ही फ्लाईट होती. मात्र काही कारणाने सुमारे ५० मिनिट उशिराने फ्लाईट निघाली. त्यानंतर १वाजून ४० मिनिटांनी पुण्यात उतरणाऱ्या प्रवाशांना बराच वेळ उलटूनही सामान मिळाले नाही. विमान प्रशासनाकडे अधिक चौकशी केली असता वजन जास्त झाल्याने त्यांना न विचारताच त्यांचे सामान काढून ठेवल्याचे उत्तर देण्यात आले. यात सुमारे ५० प्रवाशांच्या सामानाचा समावेश आहे.
या सामानात काही प्रवाशांच्या कपड्यांसह घराच्या चाव्या, कार्यालयाची कागदपत्रे आहेत. . त्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून न विचारता सामान काढून कसे ठेवले असा सवालही विचारला आहे. याबाबत संबंधित कंपनीने चूक मान्य केली असून उद्या सामान घरपोच करण्याचा वायदा केला आहे. पण यामुळे झालेला मनस्ताप आणि होणारे परिणाम यासाठी मनाने कारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करायला हवी असे मत प्रवासी कौशल झा यांनी व्यक्त केले. विमानतळ प्रशासनाशी संपर्क केला असता तिथून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा अनुभवही त्यांनी सांगितला. आदिती खेतान या पाटण्यातील विद्यार्थिनीचा यात समावेश असून आज एमआयटी कॉलेजमध्ये तिला ऍडमिशन घ्यायची होती. मात्र तिचे सर्व कागदपत्र बॅगेत असून सर्व सामान पाटण्यात राहिले आहे. अनामिक नावाची विद्यर्थिनीही अडचणीत असून तिला सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्रवेश घ्यायचा असून कॉलेज आणि होस्टेलसाठी भरलेल्या पैशांचा डीडी असलेली बॅगही आणण्यात आलेली नाही. तिचे पुण्यात कोणीही नातेवाईक नसल्याने आजचा दिवस आणि रात्र कुठे राहू असा सवाल तिच्यापुढे आहे.