तिखट, चमचमीतचा नाद खुळा, पोटात अल्सर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:10 AM2021-09-03T04:10:04+5:302021-09-03T04:10:04+5:30

ॲॅसिडीटीच्या गोळ्यांमुळे आजार : तरुणांमध्ये वाढते प्रमाण पुणे : तिखट, तेलकट आणि मसालेदार पदार्थ जिभेचे चोचले पुरवत असले, तरी ...

Spicy, sparkling sound, stomach ulcer! | तिखट, चमचमीतचा नाद खुळा, पोटात अल्सर !

तिखट, चमचमीतचा नाद खुळा, पोटात अल्सर !

googlenewsNext

ॲॅसिडीटीच्या गोळ्यांमुळे आजार : तरुणांमध्ये वाढते प्रमाण

पुणे : तिखट, तेलकट आणि मसालेदार पदार्थ जिभेचे चोचले पुरवत असले, तरी शरीरासाठी ते अत्यंत अपायकारक असतात. शरीरातील आम्लाचे प्रमाण वाढल्याने पोटाचा, आतड्यांचा अल्सर होण्याची भीती असते. चुकीच्या आहारपध्दती, तणाव, अपुरी झोप यामुळे अल्सर उदभवू लागतो. तरुण वयात वाढता अल्सर ही सध्या चिंतेची बाब ठरत आहे. अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी जर्नलमध्ये छापून आलेल्या अहवालानुसार, अँटासिडच्या गोळ्यांमुळे अल्सर, हर्निया अशा आजारांना आमंत्रण मिळते.

आम्लपित्ताचा त्रास होत असल्यास प्रत्येक वेळी डॉक्टरकडे जाणे शक्य नसल्याने आणि कोणत्या औषधाने आराम मिळतो, याची कल्पना असल्याने गोळ्यांचे सातत्याने सेवन केले जाते. अँटासिडच्या औषधांमध्ये आम्लाला मारक ठरणाऱ्या घटकांचा समावेश असतो. औषधांमधील घटकांमधून आपण आम्लावर मारा करत असतो. त्यामुळे आम्ल तयार होण्याची किंवा त्याचे प्रमाण कमी होण्याची प्रक्रिया नैसर्गिक रितीने होत नाही. यामुळे पित्ताशयाला सूज येण्याची, आतड्यांमध्ये आणि अन्ननलिकेमध्ये जखमा होण्याची आणि त्याची परिणती अल्सरमध्ये होण्याची शक्यता वाढते.

अर्धे लक्ष टीव्हीत असल्याने अन्नाचे घास पूर्ण चावले जात नाहीत. बरेचदा अन्न नुसते गिळले जाते. त्यामुळे अपचनाचा त्रास उद्भवतो. अन्न नीट न चावता खाल्ल्याने पोट फुगते, आतड्याशी संबंधित विकार उद्भवतात. पित्ताशयात खडे होऊ शकतात. पोटदुखीचा त्रास होत असल्यास दुखणे अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले जात आहे. अल्सरचा त्रास होऊ नये, यासाठी आहारात कच्च्या भाज्या, फळे, सॅलड यांचा समावेश करावा. दही, ताकाच्या सेवनानेही पोटाला थंडावा मिळतो.

---------

अन्न पचण्याची प्रक्रिया तोंडापासूनच सुरू होते. अन्न नीट न चावता गिळल्यास अपचनाचा त्रास सुरू होतो, पित्त वाढते. वारंवार पोटदुखी उद्भवते. त्यामुळे जेवताना स्क्रीनसमोर न बसण्याची शिस्त कुटुंबाने पाळायला हवी. शरीराशी संबंधित बहुतांश आजार हे पोटाशी आणि पचनाशी संबंधित असतात. बरेचदा टीव्ही पाहत जेवल्याने अतिरिक्त अन्न पोटात जाते आणि वजन वाढते. अपचन झाले की ॲसिडीटीचा त्रास होतो. ॲसिडीटी वारंवार होत राहिली तर आतड्याचा किंवा पोटाचा अल्सरही होऊ शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने जेवणे टाळावे.

- डॉ. रोहित पिंगळे, पोटविकारतज्ज्ञ

-------------------------

अल्सरची लक्षणे :

- अपचन, छातीत जळजळ

- मळमळ, उलट्या

- वजन वाढणे किंवा कमी होणे

- पोटात तीव्र वेदना

- वारंवार भूक लागणे

-------------

उपाय कोणते?

- आहाराच्या, झोपेच्या वेळा नियमितपणे पाळाव्यात.

- मसालेदार, तिखट, तेलकट पदार्थांचे वारंवार सेवन करू नये.

- आम्लपित्ताचा त्रास होत असल्यास लिंबू पाणी, फळांचा रस, कोकम सरबत, आवळा यांचे सेवन करण्यावर भर द्यावा.

- दिवसभर भरपूर पाणी प्यावे. चहा, कॉफी यांचे अतिसेवन टाळावे.

- धूम्रपान, मद्यपान टाळावे.

- आले, लिंबू यांच्यापासून तयार केलेल्या पाचकाच्या सेवनाने पित्त कमी होण्यास मदत होते.

Web Title: Spicy, sparkling sound, stomach ulcer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.