पालक जिंकले ! अखेर एमअायटीकडून जाचक अटी मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 05:14 PM2018-07-05T17:14:42+5:302018-07-05T18:00:27+5:30
पुण्यातील एमआयटीच्या विश्वशांती गुरुकूल प्रशासनाने अखेर पालकांच्या संतापापुढे गुडघे टेकले
पुण्यातील माईर्स एमअायटीच्या विश्वशांती गुरुकुल या शाळेने विद्यार्थी व पालकांवर लादलेल्या अटींवर चहुबाजूंनी टीकेची झाेड उठल्यानंतर शाळेकडून लादण्यात अालेल्या तुघलकी अटी अाता मागे घेण्यात अाल्या अाहेत. शाळेच्या प्राचार्यांनी एका निवेदनाद्वारे या अटी मागे घेत असल्याचे सांगितले अाहे.
पुण्यातील माईर्स एमअायटीच्या विश्वशांती गुरुकुल शाळेने विद्यार्थी व पालकांवर अनेक तुघलकी अटी व नियम लादले हाेते. या विराेधात पालकांमध्ये संतापाची लाट उसळली हाेती. चिडलेल्या पालकांनी बुधवारी प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर यांना घेराव घालत शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली. एमअायटी शाळेच्या प्रशासनाने विद्यार्थी व पालकांसाठी डायरीमार्फत एक नियमावली जाहीर केली हाेती. ज्यात मुलींची अंतर्वस्त्र पांढऱ्या किंवा क्रीम रंगाची असावीत,लिपस्टिक, लिप ग्लास किंवा अन्य कुठलीही कॉस्मेटिक्स लावायचे नाही, कानातले सोडून कोणतेच दागिने घालायचे नाही, शाळेच्या परवानगीशिवाय विद्यार्थी आणि पालक, शाळेत किंवा शाळेच्या कॅम्पसच्या बाहेर कुठल्याही सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचं नाही, विद्यार्थी आणि पालकांनी शाळेविरोधात आंदोलन करु नये अश्या अटींचा त्यात समावेश हाेता. तसेच या अटींचा भंग केल्यास फाैजदारी कारवाई करण्यात येईल असे प्रतिज्ञापत्र पालकांकडून लिहून घेण्यास सांगण्यात अाले हाेते. माईर्स एमआयटीच्या विश्वशांती गुरुकुलच्या अंतर्गत येणाऱ्या श्री सरस्वती न्यू इंग्लिश शाळा, श्री स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा आणि एमआयटी पूर्व प्राथमिक शाळेच्या प्रशासनाने विद्यार्थी आणि पालकांसाठी डायरीमार्फत ही नियमावली लादण्यात अाली हाेती. विद्यार्थ्यांना शिस्त लागावी आणि मुलींची छेडछाड होऊ नये म्हणून हे नियम तयार केल्याचं शाळेकडून सांगण्यात अालं हाेतं.
दरम्यान शिक्षण मंत्री यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून शाळेची चाैकशी करुन कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बाेलताना सांगितले. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शाळेच्या या जाचक अटींचा निषेध करुन गुरुवारी शाळेत अांदाेलन करुन या अटी मागे घेण्यासंदर्भात शाळा प्रशासनाला निवेदन दिले. शाळा प्रशासनाने विद्यार्थी व विद्यार्थीनींच्या गणवेशासंदर्भात डायरीमध्ये दिलेल्या सूचना या काेणाच्याही वैयक्तिक अथवा सामूहिक भावना दुखावण्याचा हेतू शाळा प्रशासनाचा नव्हता व नाही. याबाबत शाळेच्या प्रशासनाकडून सदैव विद्यार्थी केंद्रीत विचार करुन संबंधीत डायरी व सूचना मागे घेण्यात येत अाहेत असे शाळाप्रशासनाने जाहीर केलेल्या निवेदनात म्हंटले अाहे.