८ महिन्यांच्या बाळाच्या मणक्याची शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:09 AM2021-07-17T04:09:33+5:302021-07-17T04:09:33+5:30
पुणे : मणक्याच्या दुर्मीळ आजाराने ग्रस्त ८ महिन्यांच्या बाळावर डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. या बाळाला (मुलगी) ‘लेहमन सिंड्रोम’ किंवा ...
पुणे : मणक्याच्या दुर्मीळ आजाराने ग्रस्त ८ महिन्यांच्या बाळावर डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. या बाळाला (मुलगी) ‘लेहमन सिंड्रोम’ किंवा ‘लॅटरल मेंनिंगोसेल सिंड्रोम’ हा दुर्मीळ आजार असल्याचे निदान झाले. यावर उपचार म्हणून एकाच वेळेस मणक्यावर व पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीममध्ये डॉ. नितीन लोंढे यांच्यासह बालरोग शल्यचिकित्सक डॉ. अभिजित बेणारे, बालरोग मेंदूतज्ज्ञ डॉ. अभिजित बोत्रे आणि भूलतज्ज्ञ डॉ. शैलेंद्र कानडे यांचा समोवश होता.
डॉ. नितीन लोंढे म्हणाले, “लेहमन सिंड्रोम किंवा लॅटरल मेंनिंगोसेल सिंड्रोम ही अत्यंत दुर्मीळ व अनुवंशिक स्थिती आहे. त्याचा परिणाम बाळाच्या मणक्याच्या व नसांच्या वाढीवर होतो. एरवी ही विकृती पाठीवर दिसून येते, मात्र या दुर्मीळ स्थितीत ही विकृती पाठीच्या आतील बाजूस किंवा पोटातही वाढलेली होती. याचे निदान केवळ तपासण्यांद्वारे शक्य होते. या बाळाचा एक पाय कमकुवत होता. एमआरआय चाचणीत दुर्मीळ स्थितीचे निदान झाले. आईच्या पोटात बाळाची वाढ होताना अगदी दुर्मीळ स्थितीत असा रचनात्मक बिघाड होऊ शकतो. जन्मानंतर त्याचा परिणाम जाणवू लागतो.”
चौकट
शस्त्रक्रियेत गुंतागुंत
शस्त्रक्रियेत अनेक जोखमी होत्या. बाळ लहान असल्याने जास्त रक्तस्राव झेपला नसता. त्याशिवाय शरीरात छिद्र करताना गाठ काढण्यासाठी नाजूक नसा व इतर अवयवांना धक्का लागणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे होते. या सर्व गोष्टींसाठी न्युरोमॉनिटरिंग आणि मायक्रोस्कोप यासारखे तांत्रिक साहाय्य घेतले. उपलब्ध शास्त्रीय साहित्य व नियतकालिकांमधील संदर्भीय स्रोतानुसार, लेहमन सिंड्रोम किंवा लॅटरल मेंनिंगोसेल सिंड्रोम ही अत्यंत दुर्मीळ अशी स्थिती असून भारतात यापूर्वी अशा प्रकाराच्या फक्त बारा घटनांची नोंद आहे.