अध्यात्माचे सूत्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते
By admin | Published: April 26, 2015 01:25 AM2015-04-26T01:25:47+5:302015-04-26T01:25:47+5:30
सामान्य माणसांच्या डोळ्यासमोर श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वरांची प्रतिमा शाहू मोडक यांच्या रूपात दिसते, कारण त्यांनी मालिकांमधून तो अभिनय उत्तमरीत्या रेखाटला;
पुणे : सामान्य माणसांच्या डोळ्यासमोर श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वरांची प्रतिमा शाहू मोडक यांच्या रूपात दिसते, कारण त्यांनी मालिकांमधून तो अभिनय उत्तमरीत्या रेखाटला; त्यामुळे अध्यात्माचे सूत्र मोडक यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आणि त्यांच्या चरित्रामध्ये दिसते, असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्ष सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
शाहू मोडक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने, २१वा शाहू मोडक स्मृती पुरस्कार बालकलाकार श्रुती कार्लेकर, बालगायक अद्वैत केसकर, जिद्द हा सोनाली नवांगुळ, पंचांगकर्ते मोहन दाते यांना देण्यात आला, त्या वेळी मोरे बोलत होते. पुष्पगुच्छ, प्रशस्तिपत्रक सन्मानचिन्ह, रोख ७ हजार रुपये, असे पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी नाट्य संमेलनाध्यक्ष फय्याज, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गिरीश बापट, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रतिभा मोडक, रवींद्र घाटपांडे उपस्थित होते.
मोरे म्हणाले, ‘‘मोडक यांनी जात, धर्म, भाषा यांना महत्त्व दिले नाही. त्यांनी धर्माचा सखोल अभ्यास केला होता. अभिनय करताना ते अंतर्मनातून करायचे.’’ बालकलाकार कार्लेकर हिने रमा-माधव चित्रपटातील छोटासा अभिनय करून दाखविला. (प्रतिनिधी)
४पुरस्कारार्थी दाते म्हणाले, ‘‘पंचांग या क्षेत्रातील पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. भारतीय संस्कृती जतन करण्याचे काम पंचांग करते, पंचांगाचे स्वरूप बदलत असले तरी मोबाईल, इंटरनेटच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचत आहे.’’
४फय्याज म्हणाल्या, ‘‘मोडक यांच्याबरोबर काम करण्याचा योग मला मिळाला, याबद्दल मी भाग्यवान आहे. त्यांनी समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम केले.’’
४बापट म्हणाले, कोणी पैशासाठी, कोणी प्रसिद्धीसाठी कलाकार होतात; पण शाहू मोडक हे त्यांच्या कलेसाठी जगले व तेच अजरामर झाले. आजही ज्यांची जात-धर्म सांगावा लागतो त्यांनाच शाहू मोडक म्हणतात.