अध्यात्मिक गुरू रघुनाथ येमूलला न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:12 AM2021-07-14T04:12:28+5:302021-07-14T04:12:28+5:30
पुणे : चेन्नईच्या एका तांत्रिकाशी रघुनाथ येमूलने गणेश गायकवाड याची ओळख करून दिली होती. येमूल हा हस्तरेषातज्ञ आहे. ...
पुणे : चेन्नईच्या एका तांत्रिकाशी रघुनाथ येमूलने गणेश गायकवाड याची ओळख करून दिली होती. येमूल हा हस्तरेषातज्ञ आहे. त्याची प्रमाणपत्रे जमा करायची आहेत. त्याच्याबाबत आणखी कुणाची तक्रार असेल तर समोर येण्याचे आम्ही आवाहन केले आहे. त्याचा तपास करायचा आहे, असे सांगत सरकारी वकिलांनी त्याच्या पोलीस कोठडीमध्ये तीन दिवस वाढ करण्याची मागणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. निमसे यांना केली.
चोवीस तासांत एकही तक्रारदार समोर आलेला नाही. कुणी पुढे आल्यास येमूल याला पुन्हा पोलीस कोठडी देता येऊ शकते, असा युक्तिवाद आरोपीचे वकील अॅड प्रताप परदेशी आणि कीर्ती गुजर यांनी केला. तो ग्राह्य धरीत न्यायालयाने येमूल याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
औंधमधील एका धनिक कुटुंबातील सुनेचा छळ करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेला कथित आध्यात्मिक गुरू रघुनाथ राजाराम येमूल (४८, रा. धवलगिरी अपार्टमेंट, आयवरी इस्टेट, बाणेर) याच्या पोलिस कोठडीची एक दिवसाची मुदत मंगळवारी (दि. १३) संपली. त्यानुसार येमूल याला मे. एस. व्ही. निमसे न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर येमूल याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
उच्चशिक्षित सुनेला सिगारेटचे चटके देत, बहिरेपणा येईपर्यंत अमानुष मारहाण करणाऱ्या पती गणेश नानासाहेब गायकवाड (वय ३६) व कुटुंबातील तिघांसह आठ जणांविरुद्ध चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा जणांना तात्पुरता अटकपूर्व जामीन झाला असून, पती गणेश आणि राजू अंकुश हे फरार आहेत. याबाबत २७ वर्षीय पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. ही घटना २३ जानेवारी २०१७ पासून गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली आहे.
----------