मेट्रो वाढविणार पुण्याचा लौकिक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 02:18 AM2019-01-24T02:18:15+5:302019-01-24T02:18:22+5:30
मेट्रोची चर्चा सुरू झाली त्या वेळी मनात अनेक शंका होत्या. आता प्रत्यक्ष काम सुरू होऊन दोन वर्षे झाली;
पुणे : मेट्रोची चर्चा सुरू झाली त्या वेळी मनात अनेक शंका होत्या. आता प्रत्यक्ष काम सुरू होऊन दोन वर्षे झाली; पण मेट्रोमुळे एक वाहतूक वगळता कुठेही पाडापाडी किंवा कोणाचे नुकसान झालेले नाही. वाहतूककोंडी सुटण्यासाठी मेट्रो सुरू होणे फायद्याचेच असून, त्यामुळे पुणे शहराच्या लौकिकात भरच पडणार आहे असे मत पुण्यातील नामवंतांनी व्यक्त केले.
दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त महामेट्रो कंपनीच्या वतीने जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे ‘पुण्याची मेट्रो’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह महापालिका आयुक्त सौरव राव, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमपीएलच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, वृक्षप्रेमी एस. डी. महाजन, आर. एस. नागेशकर, शशिकांत लिमये, आर. एस. नागेशकर, टी. एम. परचुरे, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले वस्तुपाल रांका आदींनी चर्चेत भाग घेतला.
बहुसंख्य वक्त्यांनी मेट्रोच्या कामाबद्दल व त्यामुळे पुण्याचे किती नुकसान होणार आहे याबाबत शंका होती असे सांगितले, मात्र मेट्रोचे काम सुरू झाले, त्यातून आपोआप अनेक शंका मिटत गेल्या, संवाद सारख्या कार्यक्रमाला तज्ज्ञ अभियंते उपस्थित असल्यामुळे त्यांना अनेक गोष्टी विचारता आल्या, असे त्यांनी सांगितले. महाजन यांनी वृक्षांचे पुनर्रोपण करण्याच्या महामेट्रोच्या प्रयत्नांचे कौतुक केले. नवे वृक्ष लावताना देशी वृक्षच लावावेत व तसेच लावले जात आहे याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. परचुरे, रांका, राजेभोसले आदींनी मेट्रोने दोन वर्षांत काम बरेच पुढे नेले असे मत व्यक्त केले.
वर्धापनदिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी महामेट्रोने काही स्पर्धा घेतल्या होत्या. त्यात नेताजी सुभाषचंद बोस स्कूल व महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. पूर्वा कानडे, प्रचिती काटे, प्रीती पिल्लई या विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. मुख्य प्रकल्प अभियंता रामनाथ सुब्रह्मण्यम यांनी आभार मानले.
>लोक प्रतिनिधींना आमंत्रण नव्हते
कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींना बोलविले नव्हते. महापौरांनाही निमंत्रण नव्हते. मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे सध्या शहरात बºयाच ठिकाणी वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ही नाराजी व्यक्त व्हायला नको म्हणून त्यांना दूर ठेवण्यात आले असल्याचे समजते.
दीक्षित यांनी एकूणच सर्व गोष्टींचा आढावा घेत पुण्याची मेट्रो व मेट्रो स्थानके भारतात प्रसिद्ध होतील, अशी खात्री व्यक्त केली. वेगळ्या कल्पना, वेगळी डिझाइन्स यात वापरण्यात आली आहेत.
कोणत्याही गोष्टीत कसलीही कमतरता ठेवण्यात आलेली नाही असे त्यांनी सांगितले. विस्तारित मार्गांचे अनेक प्रस्ताव येत आहेत. त्यातील काहींवर काम सुरू आहे. स्वारगेट ते कात्रज या मार्गाचा प्रकल्प अहवाल आता अंतिम टप्प्यात आहे अशी माहिती त्यांनी दिली.