पिंपरी शहरात थुंकणाऱ्यांकडून दोन दिवसांत १८ हजारांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 01:36 PM2020-03-14T13:36:46+5:302020-03-14T13:45:05+5:30
गेल्या दोन दिवसांत आरोग्य विभागाची ११९ थुंकीबहादर यांच्यावर कारवाई ; सार्वजनिक ठिकाणी थुंकणे १५० रुपये दंड
पिंपरी : कोनोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाईची विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे शहरात कुठेही पिचकाऱ्या मारणाऱ्यांची आणि अस्वच्छता पसरवणाऱ्यांची आता खैर नाही. गेल्या दोन दिवसांत आरोग्य विभागाने ११९ थुंकीबहादर यांच्यावर कारवाई करून सुमारे १८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
* कोरोनापासून बचावासाठी स्वच्छता बाळगणे, वारंवार हात धुणे, उघड्यावर थुंकू नये ही खबरदारी घ्यावयाची आहे. परंतु, काही थुंकीबहाद्दर पान, मावा, गुटखा खाऊन रस्ते, इमारतीच्या कोपऱ्यात पिचकाऱ्या मारतात. महापालिकेच्या आठ प्रभागात पथकांकडून ही कारवाई करण्यात आली. थुंकणाऱ्यांसोबतच रस्त्यावर दुर्गंधी करणे, उघड्यावर लघुशंका करणे किंवा शौच करणाऱ्यांकडूनही दंड आकारला जात आहे.
.........................................
दरम्यान, थुंकीमधून या विषाणूंचा प्रसार अधिक वेगाने होतो. ही थुंकी सुकली नाही, तर पुढील काही तास या थुंकीतले विषाणू जिवंत राहतात आणि आजार बळावण्याची भीती असते. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेत स्वत:बरोबरच शहराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी रस्त्यावर थुंकू नये, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
..........
* अशी आहे दंडाची आकारणी....
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे १५० रुपये दंड, रस्त्यावर घाण करणे १८०, सार्वजनिक ठिकाणी लघवी करणे २००, उघड्यावर शौचास बसणे ५०० रुपये असा दंड आहे. दंड भरलाच नाही, तर पोलिसांत यासंबंधी तक्रार दिली जाऊ शकते, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यापूर्वी नागरिकांना गांभिर्याने विचार करावा लागणार आहे.
................................
* शाळांमध्ये घ्यावी दक्षता...
जनजागृतीसाठी महापालिकेकडून विविध उपक्रम राबविले जात असले तरी स्थानिक पातळीवर जसे शाळा, सार्वजनिक वाचनालये, झोपडपट्टी परिसरात काहीही उपाययोजना राबविल्याचे दिसत नाही. शहरात महापालिकेच्या प्राथमिक, माध्यमिक विभागाच्या १०५ शाळा आहेत. या शाळांमध्ये शिक्षण घेणारे कष्टकरी, गरजू, श्रमिकांचे विद्यार्थी आहेत. अनेक विद्यार्थी हे साहित्य खरेदी करू शकणार नाहीत. महापालिकेच्या माध्यमातून सर्व शाळांमध्ये कोरोना व्हायरस व साथीच्या आजारांपासून बचाव होण्याकरिता योग्य दर्जाचे मास्क, सॅनिटायझर, हँडवॉश तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.