तळेगाव ढमढेरेत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:10 AM2021-04-06T04:10:46+5:302021-04-06T04:10:46+5:30
शिरूर तालुक्यात कोरोणाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना तळेगाव ढमढेरे मध्ये देखील मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून येत असल्याने सोमवार (दि. ...
शिरूर तालुक्यात कोरोणाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना तळेगाव ढमढेरे मध्ये देखील मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून येत असल्याने सोमवार (दि. ५ एप्रिल) ते बुधवार (दि. ७ एप्रिल) पर्यंत तळेगाव ढमढेरे गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने आजपासून सुरु झालेल्या या बंदला ग्रामस्थ व व्यापाऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. .
आज सोमवारी बंदचा पहिला दिवस असताना या दिवशी गावातील आठवडे बाजार असूनही बंदमुळे गावात पूर्णपणे शांतता पसलेली होती.बंदमुळे गावातील हॉटेल, विविध प्रकारची व्यावसायिक दुकाने,किराणा दुकाने, भाजीपाला,फळ विक्री,कापड दुकाने,इतर उद्योग धंदे,आठवडे बाजार,शेळी व मेंढी बाजार, शाळा, सोसायट्या व तत्सम आस्थापना बंद ठेवण्यात आल्या होत्या.तर फक्त वैद्यकीय सेवा,मेडिकल, व खताची दुकाने चालू ठेवण्यात आलेली होती.बँकांना वरिष्ठ पातळीवरून आदेश नसल्याने गावातील बँका देखील चालू होत्या. मात्र बंदमुळे नागरिक बँकांकडे फिरकले नाहीत. तर सकाळी व सायंकाळी ६ ते ८ या कालावधीत दूध वितरण सुरू ठेवण्यात आलेले आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे गाव बंद ठेवण्यात आलेल्या असल्याने बंदच्या काळात नागरिकांनी विनाकारण गावातून फिरू नये.तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्यामुळे प्रत्येकाने प्रशासनास सहकार्य करण्याचे तसेच ४५ वर्षावरील सर्व नागरिकांनी तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करून घेण्याचे आवाहन देखील ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर यांसह ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.
स्थानिक प्रशासनाने पत्र दिले होते त्यानुसार बँका बंद ठेवण्याबाबत वरिष्ठ पातळीवर आरबीआय अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला होता परंतु वरीष्ठ अधिकारी, आरबीआय अधिकारी अथवा तहसीलदार, प्रांताधिकारी यांचे कोणतेही आदेश नसल्याने बँक चालू ठेवावी लागली आहे.
-
दिलीप सानप,शाखा व्यवस्थापक,आयडीबीआय बँक.
तळेगाव ढमढेरे येथे कडकडीत बंदमुळे पेठेतील बंद असलेली सर्व दुकाने व शुकशुकाट.