पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्हयात 'जनता कर्फ्यू' ला उत्स्फूर्त प्रतिसाद; रेल्वे, एसटी, पीएमपी ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 01:01 PM2020-03-23T13:01:18+5:302020-03-23T13:06:26+5:30

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आव्हानाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Spontaneous response to 'Janata curfew' in Pune city, Pimpri Chinchwad and district; Railway, ST, PMP stop | पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्हयात 'जनता कर्फ्यू' ला उत्स्फूर्त प्रतिसाद; रेल्वे, एसटी, पीएमपी ठप्प

पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्हयात 'जनता कर्फ्यू' ला उत्स्फूर्त प्रतिसाद; रेल्वे, एसटी, पीएमपी ठप्प

googlenewsNext
ठळक मुद्देवाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईरविवारी वाहतूक कर्मचाऱ्यांना अनेक वर्षांनंतर निवांत राहण्याचा अनुभव घेता आला

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता संचारबंदीच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीसह एसटी बस, रेल्वे वाहतूकही रविवारी जवळपास ठप्प होती. सकाळी मार्गावर आलेल्या पीएमपीच्या काही बस दुपारनंतर आगारात स्थिरावल्या. तर, एसटीची एकही बस मार्गावर आली नाही. रेल्वेच्या १३ लोणावळा लोकलही रिकाम्या धावल्या. विमानसेवा काही प्रमाणात सुरू असली, तरी निम्म्या विमानांचेही उड्डाण झाले नाही. 

पिंपरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रविवारी पिंपरी-चिंचवड लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे औद्योगिकनगरी ठप्प झाली होती. शहरवासीयांनी शंभर टक्के लॉकडाऊनला प्रतिसाद दिला. शहरातील रस्ते, मॉल, भाजीमंडई, बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. नागरिकांनी घरी राहणेच पसंत केले. कुटुंबाबरोबर वेळ दिला. सोशल मीडिया आणि दूरचित्रवाहिनीवरील मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा आनंद लुटला. लॉकडाऊनमुळे गर्दीचा पुणे-मुुंबई महामार्गही ओस पडला होता. सायंकाळी पाचच्या सुमारास गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांनी टाळ््या आणि थाळ््या वाजविल्या. पुणे-मुंबई महामार्गावर शुकशुकाट दिसून आला. तसेच  चिंचवड, पिंपरी, भोसरी, निगडी, हिंजवडी, चिंचवड स्टेशन परिसरातील मॉलही बंद होते. 
दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी या रेल्वेस्थानकांवर शुकशुकाट दिसून आला. तसेच वल्लभनगर येथील एसटी महामंडळाचे बसस्थानक, तसेच भोसरी, चिंचवड, वाकड येथील एसटी बसथांब्यांवर शुकशुकाट होता. 

पुणे : जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी स्वयंस्फूतीने जनता कर्फ्यू पाळत कोरोना विरोधाच्या लढ्यात आम्ही एकत्र आहोत असा संदेश रविवारी दिला. सकाळपासूनच जिल्ह्यातील महामार्ग, राज्य मार्ग, जिल्हा मार्ग तसेच गावातील रस्ते ओस पडले होते. बहुतांश नागरिकांनी शनिवारीच जीवनावश्यक वस्तू घरी आणून ठेवल्या होत्या. यामुळे नागरिक दिवसभर घरीच होते. सायंकाळी ५ वाजता नागरिकांनी उत्फूर्तपणे घरात तसेच रस्त्यावर येत थाळी आणि टाळ्या वाजवत कोरोना विरोधात लढणाºया आरोग्य यंत्रणा, डॉक्टर, पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेचे कौतुक केले. 
खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर, भोर, वेल्हा, मुळशी, हवेली तालुक्यात पहाटेच शेतकऱ्यांनी दूध दूध संकलन केंद्रात दिले. यानंतर बंदमध्ये सहभागी होत दिवसभर बाहेर पडण्याचे टाळले. जिल्ह्यातील पुणे-नाशिक मार्ग, पुणे-सोलापूर मार्ग, पुणे-सातारा मार्ग, पुणे-नगर मार्गावर इतिहासात एकही वाहने धावले नाही. संपूर्ण दिवसभर हे महामार्ग ओस पडले होते. जिल्ह्यात पोलीस यंत्रणा रस्त्यावर गस्त घालत होते.

जनता संचारंबदीमुळे पीएमपीच्या केवळ २५ टक्के बस मार्गावर येणार होत्या. पण, रविवारी प्रत्यक्षात सकाळपासून प्रवासी संख्या तुरळक असल्याने ३०० पेक्षा कमी बस मार्गावर येऊ शकल्या. सासवड, राजगुरुनगर, खानापूर आदी लांबपल्ल्याच्या मार्गावरच प्रवासी होते. दुपारनंतर हे प्रवासीही मिळू न शकल्याने बससेवा थांबवावी लागली. दिवसभरात केवळ पाच हजार प्रवासी मिळाले असून, त्याद्वारे ९० हजार उत्पन्न प्राप्त झाले. या प्रवाशांमधील बहुतेक जण अत्यावश्यक सेवेतील असतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एसटी बसला शुक्रवार व शनिवारी मोठी गर्दी झाली होती. पण, रविवारी संचारबंदीमुळे एसटीच्या पुणे विभागातील एकाही आगारातून बस मार्गावर आली नाही. प्रवासी असतील तर बस सोडण्यात येईल, असे एसटी अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, बसस्थानकांकडे प्रवासी फिरकलेच नाहीत. 
रेल्वेकडून लोणावळा लोकल वगळता अन्य लांबपल्ल्याच्या गाड्या, पॅसेंजर, डेमू बंद ठेवण्यात आल्या होत्या. पुण्यातून लोणावळ्याकडे जाण्यासाठी सहा, तर लोणावळ्याकडून पुण्यासाठी सात लोकल सोडण्यात आल्या. पण, या गाड्याही जवळपास रिकाम्या धावल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. सकाळी सात वाजण्यापूर्वी ठिकठिकाणांहून निघालेल्या नियमित धावणाऱ्या लांबपल्ल्याच्या बहुतेक सर्व गाड्या पुणे स्थानकात येत होत्या. त्यामुळे या गाड्या आल्यानंतर, काही प्रमाणात प्रवाशांची ये-जा दिसत होती. तसेच रेल्वेच्या आवारातही काही प्रवासी रेल्वेसेवा सुरू होण्याच्या आशेने बसून होते. 
विमानतळावरील विमान उड्डाणांची संख्याही मोठ्या प्रमाणावर रोडावली होती. रविवारी विमानतळावर ४० विमाने उतरली, तरी ४० विमानांनी उड्डाण केले. पण प्रवासी संख्या सुमारे २ हजार एवढी कमी होती. रिक्षा, खासगी कॅब सेवाही पूर्णपणे बंद राहिली. 
...........
वाहतूक नियंत्रण कक्षाला मिळाली उसंत
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आव्हानाला शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या वाहतूक नियंत्रण कक्षात रविवारी शुकशुकाट पाहायला मिळाला. तसेच शहरातील विविध भागांमधील रस्त्यावर तुरळक वाहने दिसून आली. त्यामुळे रविवारी वाहतूक कर्मचाऱ्यांना अनेक वर्षांनंतर निवांत राहण्याचा अनुभव घेता आला........
..................
शहरातील वाहतूक यंत्रणेवर लक्ष ठेवण्यासाठी एकूण ५०९ चौकांमध्ये विविध ठिकाणी तब्बल १ हजार २३0 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यात स्वारगेट, बंडगार्डन, डेक्कन पीएमपीएस बसथांबा, जहांगीर हॉस्पिटल, बालगंधर्व, मार्केट यार्ड आदी महत्त्वाच्या चौकांचा समावेश आहे. या चौकांमधील वाहतुकीवर वाहतूक नियंत्रण कक्षाकडे लक्ष दिले जाते. त्याचप्रमाणे विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या, सिग्नल तोडणाऱ्या, झेब्रा क्रॉसिंगवर उभी राहणारी वाहने यांच्यावर नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवले जाते. तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, रविवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अनेक रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. वाहतूक कक्षातील कर्मचाऱ्यांना त्यामुळे शांतपणे इतर प्रशासकीय कामे करता आली.
.....................

Web Title: Spontaneous response to 'Janata curfew' in Pune city, Pimpri Chinchwad and district; Railway, ST, PMP stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.