खराडीत लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:10 AM2021-04-07T04:10:33+5:302021-04-07T04:10:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खराडीतील महानगरपालिकेच्या दवाखान्यात उस्फूर्त प्रतिसादात लसीकरण केंद्र सुरू झाले. लसीकरणाला चांगलाच प्रतिसाद मिळाल्यामुळे गर्दी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खराडीतील महानगरपालिकेच्या दवाखान्यात उस्फूर्त प्रतिसादात लसीकरण केंद्र सुरू झाले. लसीकरणाला चांगलाच प्रतिसाद मिळाल्यामुळे गर्दी वाढली. दवाखान्यातील कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे अचानक वाढलेल्या गर्दीमुळे ताण वाढला. त्यामुळे लसीकरणासाठी वेळ लागत होता. असे असले तरी नागरिकांनी केंद्र सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
लस घेण्यासाठी कोविन ऑपवर ऑनलाईन नोंदणी करणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता नागरिक थेट आल्याने काही काळासाठी गोंधळाचे वातावरण होते. दवाखान्यात अपुरी जागा पडल्याने अडचणी येत होत्या. १ वैद्यकीय अधिकारी, ३ परिचारिका, १ सेवक अशा एकूण ५ कर्मचाऱ्यांवर अचानक वाढलेल्या गर्दीमुळे ताण वाढला.
मंगळवार असल्याने बाळांसाठी लस देखील दिली जात होती. तपासणीसाठी देखील रुग्णांची ये-जा सुरु होती. दिवसभरात ४२ बाळांचे लसीकरण, ८० व्यक्तींना कोविड लस, तसेच ओपीडीचे ८३ रुग्णांची तपासणी अशा एकूण २०५ जणांना एकाच दिवशी सेवा देण्यात आली. यामुळे दवाखान्यात गर्दी वाढली. मात्र स्वयंसेवक तसेच पालिकेचे सुरक्षा रक्षक यांच्यामुळे सुरक्षित अंतर पाळता आले.
गरोदर महिला, मुले आणि मातांचे दवाखान्यात येणाचे प्रमाण मोठे आहे. गर्दी टाळण्यासाठी तसेच लस घेणाऱ्या व्यक्तींना गैरसोय होऊ नये यासाठी बैठक व्यवस्था तसेच ऑनलाईन नोंदणीसाठी मदत केंद्र सुरु केले जाईल. प्रतीक्षा कक्ष देखील केला जाईल. त्यामुळे नारिकांनी लस घेण्यासाठी येत असताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन माजी आमदार बापू पठारे यांनी केले.