अनोळखी व्यक्तींकडून ‘बनवाबनवीचा’ खेळ सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 02:36 AM2019-03-02T02:36:52+5:302019-03-02T02:36:57+5:30
ज्येष्ठ नागरिक होतात लक्ष्य : ऑनलाइनच्या आर्थिक व्यवहारात होतेय फसवणूक
पुणे : नवीन एटीएमचा पिन नंबर, पासवर्ड बदलण्याच्या निमित्ताने, पैसे काढण्याच्या उद्देशाने ऑनलाइनच्या व्यवहारात सध्या मोठ्या संख्येने गुन्हे वाढत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे यात ज्येष्ठ नागरिक, महिला यांना लक्ष्य केले जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. कित्येक घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या असहायता आणि अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांची फसवणूक होण्याचे प्रकार शहरात सातत्याने होत आहेत.
चंदननगर भागात एटीएम मशिन गॅसकटरच्या साह्याने फोडून २१ लाखांची रोकड नेली. तर, खडक भागात बँकेतूनच नजर चुकवून २८ लाखांची रोकड असणारी पेटी चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. अद्याप हे चोरटे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या टोळ्या परराज्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक लगड व त्यांचे कर्मचारी मेमाणे, कापरे व चिरमे हे गुरुवारी पहाटे हद्दीत गस्त घालत होते. साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांना जंगली महाराज रस्त्यावर आल्यानंतर बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशिनमध्ये दोन तरुण असल्याचे आढळून आले. यामुळे त्यांच्याकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. त्यांची झडती घेतली असता त्यांना १८ एटीएम व १६ हजारांची रोकड सापडली.
दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. अधिक तपास केला असता छेडछाड करून पैसे काढल्याची कबुली दिली. तर, त्यांचा एक साथीदार सोडून गेल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी संबंधित बँकेला माहिती दिली. यानंतर पोलिसांकडे धाव घेतली.
‘त्या’ दोघांकडून मिळाले १८ एटीएम कार्ड
कार्ड मशिनमध्ये टाकून पिन क्रमांक व रक्कम टाकली जाते. रक्कम बाहेर येताच आरोपी एटीएम मशिनमध्ये छेडछाड करत. त्यामुळे त्यांना पैसेही मिळत होते आणि खात्यावरून पैसेही जात नव्हते. यानंतरही हे आरोपी बँकेलाच आमचे ट्रान्झॅक्शन फेल झाले असून, पैसे मिळाले नसल्याचे सांगत. त्यामुळे बँकेलाच आर्थिक भुर्दंड बसत होता. दोघांकडून १८ एटीएम कार्ड मिळाले आहेत. याबाबत आणखी चौकशी सुरू असल्याचे निरीक्षक लगड यांनी सांगितले.