पुण्यात होणार दिव्यांग क्रीडा प्रबोधिनी : आयुक्तालयाकडून योजनेचा मसुदा सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 06:00 AM2019-02-01T06:00:00+5:302019-02-01T06:00:08+5:30
यातून दिव्यांग क्रीडापटूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळणार आहे...
- विशाल शिर्के-
पुणे : दिव्यांगांमधील क्रीडा गुणांना वाव मिळावा, त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळावी, त्यांचा शारीरिक व्यक्तीमत्व विकास व्हावा या उद्देशाने पुण्यात दिव्यांगांसाठी विशेष सुविधा असलेली क्रीडा प्रबोधिनी उभारण्यात येणार आहे. प्रत्येक खेळाडूमागे क्रीडा प्रशिक्षण आणि निवासासह वार्षिक तब्बल ३ लाख रुपयांचा खर्च करण्याचे प्रस्तावित असून, अपंग कल्याण आयुक्तालयाने त्याचा मसुदा नुकताच राज्य सरकारला सादर केला आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या बैठकीत क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचा मसुदा तयार करण्याचे आदेश सामाजिक न्याय मंत्रालयाने अपंग कल्याण आयुक्तालयाला दिले होते. या क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून निवडक खेळाडूंना विविध खेळांचे मोफत प्रशिक्षण देण्यात येईल. त्यासाठी दिव्यांग खेळाडूंना अडथळा विरहीत वातावरण असलेले मैदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. दिव्यांग खेळाडूंना त्यांच्या आवश्यकतेनुसार व अपंगत्वाच्या प्रकारानुसार सहाय्यक साधने व तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्याचे उद्दीष्ट आहे. यातून दिव्यांग क्रीडापटूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळणार आहे. या शिवाय क्रीडा आरक्षणाच्या माध्यमातून दिव्यांग खेळाडूंना चांगला रोजगार देखील उपलब्ध होईल.
दिव्यांग खेळाडूंना प्रशिक्षणासाठी वार्षिक ६० हजार देण्याबरोबरच निवास शुल्क, गणवेश अशा विविध गोष्टींसाठी २० हजार रुपये दरमहा निर्वाह भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली आहे. निवासी क्रीडा प्रबोधिनीचे ठिकाण पुणे हेच असेल. या योजनेअंतर्गत शंभर लाभार्थ्यांसाठी वार्षिक ३ कोटी रुपयांचा खर्च येईल, असे प्रस्तावात म्हटले आहे. योजनेची जाहीरात प्रसिद्ध झाल्यानंतर प्रबोधिनीसाठी अर्ज मागविण्यात येतील. त्यानंतर अपंग कल्याण आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती खेळाडूंची निवड करेल. क्रीडा प्रबोधिनी योजना स्वयंसेवी संस्थेमार्फत राबविण्यात येणार आहे.
------------------
हे उमेदवार असतील पात्र
-लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा
-अपंगत्वाचे प्रमाण किमान चाळीस टक्के असावे
-लाभाथ्यार्चे वय ८ ते १४ असावे
- शहरी आणि ग्रामीण भागातून निम्म्या उमेदवारांची होणार निवड
-------------------
अशा असतील योजनेतील सवलती
-दिव्यांगाना प्रवास, मदतनीस आणि प्रशिक्षकासाठी सहाय्य
- जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे शुल्क देणे
-स्वयंसेवी संस्थांना प्रत्येक दिव्यांग खेळाडूमागे दरमहा ५ हजार रुपये देणे
-गणवेश, निवास निर्वाह भत्त्यापोटी दरमहा २० हजार रुपयांचा भत्ता
- एकूण प्रत्येक विद्याथ्यार्मागे वार्षिक ३ लाखांचा होणार खर्च
-------------------