वडगावशेरीत उभारणार क्रीडा संकुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:16 AM2021-03-13T04:16:28+5:302021-03-13T04:16:28+5:30
पुणे : वडगावशेरीतील सर्व्हे नं. ३८/२, टेम्पो चौक , सोमनाथनगर रस्त्यालागत आलेल्या महानगरपालिकेच्या आरक्षित जागेत क्रीडा संकुल उभारण्यात येणार ...
पुणे : वडगावशेरीतील सर्व्हे नं. ३८/२, टेम्पो चौक , सोमनाथनगर रस्त्यालागत आलेल्या महानगरपालिकेच्या आरक्षित जागेत क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. ही माहिती नगर रोड क्षेत्रीय कार्यालय प्रभाग समितीचे अध्यक्ष व नगरसेवक संदीप जऱ्हाड यांनी दिली.
वडगावशेरीतील नागरिकांच्या मागणीनुसार सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. उपनगरात उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत हा उद्देश या मागे आहे. ३३ ते ३४ गुंठ्यांतील आरक्षित जागेत दोन टप्यात हे क्रीडा संकुल उभारले जाणार आहे. पहिल्या टप्यात जलतरण तलावाचे काम पूर्ण केले जाणार असून दिवाळीत ते जनतेसाठी खुले होईल. दुसऱ्या टप्प्यात चार मजली इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीत सर्व प्रकारच्या इंडोर गेम खेळता येणार आहेत. संकुलाचे काम एका वर्षात पूर्ण होणार असून जनतेसाठी खुले होईल, असे नगरसेवक जऱ्हाड यांनी लोकमतला सांगितले.
दरम्यान, वडगावशेरी येथे होणाऱ्या या क्रीडा संकुलाच्या कामाची सुरुवात काही दिवसांपूर्वीच झाली आहे. बुधवारी महानगरपालिकेचे भवन विभागाचे अभियंता प्रशांत महेंद्रकर , नगरसेवक संदीप जऱ्हाड, नगरसेविका शीतल शिंदे, सुनीता गलांडे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे यांनी कामाची पाहणी केली. या वेळी संकुलाच्या कामासाठी एक रुपयांचा देखील निधी कमी पडू देणार नसल्याचे नगरसेवकांनी सांगितले.