पुणे विद्यापीठातील क्रीडा संकुलाला ऑलम्पिक विजेते 'खाशाबा जाधव' यांचं नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 06:48 PM2021-09-15T18:48:53+5:302021-09-15T19:01:04+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठात आवारातील तब्बल २७ एकर जागेत सर्व प्रकारचे इनडोअर व आऊट डोअर खेळ खेळण्याची सुविधा निर्माण केली आहे
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलाला देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर ऑलम्पिकमध्ये पहिलं पदक मिळवणारे पैलवान खाशाबा जाधव यांचं नाव देण्याचा निर्णय बुधवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. दिवाळीनंतर विद्यापीठाच्या कीडा संकुलाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
महाविद्यालयीत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि विविध आंतरराष्ट्रीय स्थरावर घेतल्या जाणा-या क्रीडा प्रकारांचा सराव करता यावा,या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठात आवारातील तब्बल २७ एकर जागेत सर्व प्रकारचे इनडोअर व आऊट डोअर खेळ खेळण्याची सुविधा निर्माण केली आहे. बालेवाडी येथील क्रीडा संकुलानंतर विद्यापीठातील क्रीडा संकुल हे सर्वात मोठे कीडा संकुल असणार आहे. त्यात रनिंग ट्रॅक ,अॅथलॅटिक, टेनिस, खो-खो, कबड्डी, शुटिंग रेंज, बॅडमिंटन आदी सुमारे १०० खेळांचे प्रशिक्षण घेता येणार आहे.
विद्यापीठाने या क्रीडा संकुलासाठी सुमारे ५० कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यातील काही रक्कम विद्यापीठ अनुदान आयोगाकडून प्राप्त झाली असून काही राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाकडून (रुसा) मिळाली आहे. उर्वरित रक्कम विद्यापीठाने स्वत: खर्च केली आहे. क्रीडा संकुलाच्या आवारात सुमारे २ हजार क्षमतेचे प्रशस्त सभागृह उभारण्यात आले आहे. सुमारे पाच ते सहा वर्षापासून सुरू असलेल्या या क्रीडा संकुलाचे काम अंतिम टक्क्यात आहे. हॉकी व जलतरण तलावाचे काम पुढील एक ते दिड महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यानंतर क्रीडा संकुलाचे उद्घाटन केले जाणार आहे.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी बुधवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीय क्रीडा संकुलाला खाशाबा जाधव यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला. त्यास व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.व्ही.बी.गायकवाड यांनी अनुमोदन दिले.
राजेश पांडे म्हणाले, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या क्रीडा संकुलाचा निश्चितच फायदा होईल. क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्यामुळे खेळाडूंना आॅलंपिकसह इतर क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सराव करणे सोपे जाईल. विद्यापीठाचे माजी विद्यार्थी खाशाबा जाधव यांचे नाव क्रीडा संकुलाला दिल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल.