जलतरण तलावांत पुणेकरांच्या जिवाशी ‘खेळ’
By admin | Published: April 8, 2015 03:49 AM2015-04-08T03:49:57+5:302015-04-08T03:49:57+5:30
एकीकडे उन्हाचा कडाका वाढल्याने; तसेच शाळांना सुट्या लागल्याने पुणेकरांचे पाय जलतरण तलावाकडे वळत आहेत. दुसरीकडे मात्र या जलतरण
पुणे : एकीकडे उन्हाचा कडाका वाढल्याने; तसेच शाळांना सुट्या लागल्याने पुणेकरांचे पाय जलतरण तलावाकडे वळत आहेत. दुसरीकडे मात्र या जलतरण तलावांमध्ये सुरक्षा नियमांची पायमल्ली केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेकडून शहरात चालविल्या जाणाऱ्या काही प्रमुख जलतरण तलावांची ‘टीम लोकमत’ने पाहणी केली असता, तलावांच्या ठिकाणी महापालिकेने घालून दिलेले नियम; तसेच सुरक्षा नियमावलीस हरताळ फासला जात असल्याचे समोर आले आहे.
शहरात महापालिकेचे २१ तलाव असले, तरी त्याच्या कितीतरी अधिक पटीने खासगी सोसायट्या, हॉटेल्स; तसेच क्लबचे जलतरण तलाव आहेत. या तलावांच्या ठिकाणी सुरक्षा नियम पाळले जातात की नाही, याची तपासणी करणारी कोणतीही यंत्रणा पालिकेकडे नाही. मागील वर्षी महापालिकेच्या; तसेच एका खासगी मालकीच्या जलतरण तलावात दोघांना प्राण गमवावे लागल्यानंतर पालिका प्रशासनाकडून शहरातील जलतरण तलावांचे सेफ्टी आॅडिट करण्यासाठी विशेष समिती नेमली होती. या समितीने महिनाभर शहर पिंजून काढले. सुमारे ३५० तलावांचे सर्वेक्षण केले. त्यात २२५ हून अधिक तलावांमध्ये सुरक्षा साधनांचा अभाव असल्याचा अहवाल समितीने दिला आहे. त्यातील ८० तलावांची सुरक्षाव्यवस्था बिकट असून, त्यांना तत्काळ सुधारणांसाठी नोटिसा बजाविल्या होत्या. तसेच, सुरक्षा साधनांची पूर्तता न केल्यास, तलाव सील करण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र, पावसाळा सरताच या नोटीसचे पुढे काय झाले, याची माहितीही प्रशासनास नाही.