पुण्यात सुरू होणार स्पोर्ट्स नर्सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 02:01 AM2018-08-30T02:01:51+5:302018-08-30T02:02:23+5:30

माजी आॅलिम्पियन निखिल कानेटकर, मनोज पिंगळे, रमाकांत पेटकर, आशियाई कांस्यपदकविजेती अंकिता रैना व १९ वर्षांखालील क्रिकेटपटू पवन शहा यांचा खास सत्कार

Sports nursery to begin in Pune | पुण्यात सुरू होणार स्पोर्ट्स नर्सरी

पुण्यात सुरू होणार स्पोर्ट्स नर्सरी

Next

पुणे : राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून पुण्यामध्ये स्पोर्ट्स नर्सरीला आज प्रारंभ करण्यात आला. या स्पोर्ट्स नर्सरीमुळे क्रीडाक्षेत्रात पहिले पाऊल टाकण्यापासून तर उच्चस्तरीय कामगिरी करण्यापर्यंत सर्वांना या नर्सरीमध्ये मार्गदर्शन मिळणार आहे. या स्पोर्ट्स नर्सरीचे उद्घाटन आशियाई स्पर्धेतील कांस्यपदकविजेती टेनिसपटू अंकिता रैना, तसेच आॅलिंपिकपटू बॅडमिंटन प्रशिक्षक निखिल कानिटकर आणि आॅलिंपिकपटू मुष्टियोद्धा मनोज पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी विजय संतान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

स्पोर्ट्स नर्सरीविषयी अधिक माहिती देताना या उपक्रमाचे मेंटॉर महेंद्र गोखले आणि सुंदर अय्यर यांनी सांगितले, की अशा प्रकारची ही पहिलीच स्पोर्ट्स नर्सरी असून याचे कार्य पीवायसी हिंदू जिमखाना आणि निगडी प्राधिकरण या ठिकाणी प्रामुख्याने सुरू होणार आहे. अशा प्रकारच्या २५ स्पोर्ट्स नर्सरी या वर्षअखेरपर्यंत सुरू करण्यात येणार आहेत.

सुंदर अय्यर म्हणाले, की स्पोर्ट्स नर्सरीमध्ये चार वेगवेगळ्या पद्धतीने काम केले जाईल. यातील पहिल्या विभागात ४ वर्षांवरील मुलांसाठी त्यांची मोटरस्किल्स, तसेच धावणे, उड्या मारणे आणि आयकॉर्डिनेशन (मेंदू, डोळे व हात यांचा समन्वय) विकसित करण्यासाठी विशेष मार्गदर्शन करण्यात येईल. या स्पोर्ट्स नर्सरीमध्ये नावाप्रमाणेच ४ वर्षे किंवा त्यावरील मुलांना क्रीडा प्रशिक्षण घेण्याची मूळ कल्पना आहे. आमच्या अभ्यासाप्रमाणे या वयोगटातील मुले मैदानावर कोणतेही लक्ष न ठेवता बराच काळ विनाकारण वाया घालवताना दिसून आले असल्याचे अय्यर यांनी सांगितले.

महेंद्र गोखले म्हणाले, की आम्ही एक अभ्यासक्रम तयार केला असून त्यानुसार सुरुवातीला धावणे, फेकणे, उड्या मारणे, झेलणे असे मुक्त क्रीडाप्रकार देण्यात येणार असून मुले जसजशी मोठी होतील तसतशी त्यांना फूटवर्क, कॅलिस्ट्रेनिक्स किंवा चपळतेसाठी विशिष्ट प्रकारचे व्यायाम देण्यात येणार आहेत. दुसऱ्या विभागात खेळाडूंचे उद्दिष्ट, गरजा व क्षमता लक्षात घेऊन त्यानुसार खेळाडूंच्या क्षमतेचे विश्लेषण करण्याची प्रक्रिया राबविली जाईल. याच विभागात खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेकडे विशेष लक्ष पुरविले जाईल.

जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, पुणे, राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना व पूना कॉलेज कॅ म्प यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पूना कॉलेजच्या मैदानावर सकाळी १० वाजता शहरातील शाळांमधील खेळाडू, विद्यार्थी एकत्र आले होते. प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख व क्रीडा व युवक सेवा पुणे विभागाचे उपसंचालक अनिल चोरमले यांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रभातफेरीची सुरुवात झाली. या प्रभातफेरीत पूना कॉलेज, क्रिसेन्ट हायस्कूल, मोलेदिना हायस्कूल, माऊंट कार्मेल हायस्कूल, अँग्लो उर्दू गर्ल्स अ‍ॅन्ड बॉईज हायस्कूल, लेडी हवाबाई हायस्कूल, एस. एस. अगरवाल हायस्कूल व इतर शाळांतील खेळाडूंनी बँड पथक, झांज पथक व लेझीम पथक, तसेच क्रीडाविषयक प्रात्यक्षिक करून सहभाग नोंदविला. ही फेरी चुडामल तालीम, रामोशी गेटमार्गे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गंजपेठ येथे आली.

याप्रसंगी सावित्रीबाई फुले सभागृहात क्रीडा उपसंचालक अनिल चोरमले, माजी क्रीडा उपसंचालक जनक टेकाळे, तालुका क्रीडाधिकारी राजेश बागूल, माजी राष्ट्रीय वेगवान धावपटू व नगरसेवक अविनाश बागवे, डॉ. आफताब अन्वर शेख आदी मान्यवरांच्या हस्ते पुण्यातील क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना उत्कृष्ट क्रीडाशिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी अँग्लो उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. तसेच क्रीडा दिनानिमित्त नगरसेवक अविनाश बागवे यांनी खेळाचे महत्त्व सांगून क्रीडाशिक्षक व खेळाडूंचे कौतुक केले.

Web Title: Sports nursery to begin in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे