क्रीडा साहित्याबाबत पालिकेचा ‘खेळ’
By admin | Published: December 21, 2015 12:36 AM2015-12-21T00:36:24+5:302015-12-21T00:36:24+5:30
महापालिकेने अॅथलेटिक्सचे सिंथेटिक ट्रॅक बांधून ४ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. सरावासाठी लागणारे साहित्य प्रत्यक्ष मैदानात येण्यास नुकताच मुहूर्त लागला आहे
पिंपरी : महापालिकेने अॅथलेटिक्सचे सिंथेटिक ट्रॅक बांधून ४ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. सरावासाठी लागणारे साहित्य प्रत्यक्ष मैदानात येण्यास नुकताच मुहूर्त लागला आहे. मात्र, हे साहित्य अपूर्ण असल्याचे धक्कादायक चित्र आहे. अॅथलेटिक्स खेळ व तांत्रिक माहितीचा अभाव असल्याने महापालिकेच्या क्रीडा विभागाचा फोलपणा आणि निष्क्रियता यातून उघड झाली आहे.
महापालिकेतर्फे इंद्रायणीनगर, भोसरी येथे अॅथलेटिक्स खेळासाठी संत ज्ञानेश्वरमहाराज क्रीडा संकुलात ४०० मीटर अंतराचा सिंथेटिक ट्रॅक ४ वर्षांपूर्वी विकसित करण्यात आला. धावणे, फेकी व उडी या क्रीडा प्रकारांचा अॅथलेटिक्समध्ये समावेश आहे. मात्र, त्यासाठी लागणारे साहित्यच नसल्याने येथे स्पर्धाच होत नव्हत्या. या सिंथेटिक मैदानात क्रिकेट, फुटबॉल, विटी-दांडू आदी खेळ खेळले जात असल्याने ट्रॅक फाटला होता. तो दोनदा दुरुस्त करण्यात आला. क्रीडाप्रेमींकडून वारंवार मागणी करूनही साहित्याचा पत्ता नव्हता.
शाळा, महाविद्यालय आणि खासगी स्पोटर््स क्लबकडून साहित्य आणून शालेय आणि सब ज्युनिअर स्पर्धा उरकण्याची नामुष्की महापालिकेवर आली होती. यामध्ये संयोजक भरडले जात होते. साहित्याची ने- आण करावी लागत असल्याने येथे स्पर्धा संयोजनास अनेकांनी नकार दिला होता. अखेर ३ महिन्यांपूर्वी हे साहित्य खरेदी केले गेले. उंच, लांब, बांबू उडीचे साहित्य, अडथळा शर्यतीचे हर्डल्स, गोळा, हातोडा, भाला, थाळी, मोजणीचे साहित्य, स्टॉप वॉच, स्टार्टिंग बोर्ड, स्टार्टिंग स्टॅण्ड आदी साहित्य मैदानाच्या गोदामात आणून कुलूपबंद केले आहे.
तीन हजार मीटर धावणे स्टिपलचेस हा अडथळा आणि पाण्यातून उडी टाकत पळण्याचा एक क्रीडा प्रकार आहे. यासाठी एकूण ५ लाकडी अडथळे लागतात. मात्र, केवळ एकच अडथळा महापालिकेने खरेदी केला आहे. त्यामुळे हा क्रीडा प्रकार घेता येणार नाही. त्याचबरोबर अनेक साहित्य अद्याप खरेदी केले गेले नाही. यामुळे अनेक क्रीडाप्रकार घेता येणार नाहीत. थाळी आणि हातोडा फेकीच्या बाजूने असलेली संरक्षक जाळी अपुरी असल्याने या फटीतून थाळी किंवा हातोडा बाहेर पडून एखादी दुर्घटना घडू शकते.
मैदानात लांब उडीचे टेक आॅफ बोर्डच्या लाकडी पट्ट्या निघाल्या आहेत. त्यामुळे लांब आणि
तिहेरी उडीचा सराव करणे अडचणीचे ठरत आहे. मैदानाच्या बाजूने
गॅलरी नसल्याने खेळाडू, पालक, प्रशिक्षक आणि पंचांना नाईलाजास्तव उन्हात उभे राहावे लागते. संकुलात निवासव्यवस्था नसल्याने राज्यस्तरीय स्पर्धा येथे
घेता येणार नाहीत. बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या खेळाडूंना निवासव्यवस्था नसल्याने अशा स्पर्धांचे आयोजन करणे गैरसोईचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांचे अज्ञान
महापालिकेच्या क्रीडा विभागातील अधिकाऱ्यांना अॅथलेटिक्स खेळासंदर्भात बरेच अज्ञान आहे. साहित्य खरेदी करण्यापूर्वी अॅथलेटिक्सच्या तांत्रिक पंच आणि अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करणे गरजेचे होते. तसे क्रीडा विभागास सांगण्यात आले होते. मात्र, त्यावर योग्य ती कार्यवाही न झाल्याने आवश्यक साहित्य अद्याप उपलब्ध झालेले नाही. दरम्यान, गेल्या महिन्याअखेरीस झालेल्या शालेय विभागीय अॅथलेटिक्स स्पर्धेत काही साहित्य वापरले गेले. महापालिकेच्या दत्तक योजनेतील खेळाडूंना सरावासाठी काही साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे.